जीवनदायिनी पंचगंगेच्या आरतीची अखंड 14 वर्षे
पंचगंगा आरती भक्त मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम
कोल्हापूर/ संग्राम काटकर
पाणी म्हणजे जीवन आणि पाणी घेऊन वाहणारी नदी म्हणजे जणू जीवनदायिनी असे माणले जाते. अनेक जीवनदायिनींपैकी एक म्हणजे पंचगंगा नदी. ही नदी कोट्यावधी लोकांची जीवनदायिनी बनून तहानही भागवत आहे. नदीच्या या पुर्वापार कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी परंपरा 2009 साली पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या ज्येष्ठांनी सुऊ केली. कृतज्ञतेचाच एक भाग म्हणून पंचगंगा नदीची रोज सायंकाळी 6 वाजता आरती करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजतागायत नदीचे निस्सीम भक्त झालेले मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व लोक नदीची आरती करण्याचे पुण्यकार्य करताहेत. नदीत निर्माल्य टाकणाऱ्यांनाही अटकाव करण्याचे कामही करत आहेत. वर्षागणिक टीकून राहिलेली ही आरतीची परंपरा येत्या 15 जानेवारीला पंधराव्या वर्षात पर्दापण करत आहे.
कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि अदृश्य सरस्वती या पाच नद्यांचा संगम होऊन तयार झालेली पंचगंगा नदी बारमाही वाहते. ज्या गावांमधून वाहते त्या गावांची भाग्यरेखा बनलेली पंचगंगा शेतीला सुपीक करण्याचे कामही करत आहे. काशी, हरिद्वार व ऋषिकेश येथून वाहणाऱ्या गंगेची रोज सायंकाळी आरती केली जाते. हा आरती सोहळा नदीबद्दलचे ऋण व्यक्त करतो. याच धर्तीवर 2009 साली पांडुरंग चिले (कळंबा) व राजाभाऊ कुंभार (सायबर चौक) यांनी पंचगंगेची रोज सायंकाळी 6 वाजता मावळतीला सूर्यकिरणांच्या साक्षीने आरतीची परंपरा सुरू केली. त्यासाठी शंकरायार्च, वेदमूर्ती सुहास जोशी व मूर्ती अभ्यासक उमांकात राणिंगा यांचे मार्गदर्शन घेऊन जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथील मित्रांना एकत्र आणत पंचगंगा आरती भक्त मंडळाची स्थापना केली. नदी घाटावरील शिवलिंग, श्रीकृष्ण, अंबाबाई, माऊती, जोतिबा, नाग आदींच्या मूर्तींसह व पद्मनाभ स्वामींच्या पादुका असलेले मंदिर आरतीचे ठिकाण ठरवले. मंदिराजवळ उभे राहून गणपती, श्रीकृष्ण, अंबाबाई, हनुमानासह नदीची आरती कऊ लागले. ‘दक्षिण काशी देशी कोल्लापूरग्राम...शोभे मुक्तापूर जे विश्वेश्वरी धाम...’ असे नदीच्या आरतीचे बोल आहेत. आरतीनंतर नदीला द्रोणातून दिवाही अर्पण केला जाऊ लागला.
सलग तीन वर्षे श्रीकृष्ण जिल्हेदार यांनी आरतीची जबाबदारी स्वीकारली. 2013 साली जिल्हेदार यांचे निधन झाले, आरती परंपरा सुऊ करणारे चिले यांचे 2015 साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही शालन भुर्के (शुक्रवार पेठ), स्वप्नील मुळे (पापाची तिकटी) यांनी आरती परंपरा पुढे सुरू ठेवली. तेव्हापासून आजतागायत कोरोना काळातील अपवाद वगळता अखंडपणे आरती सोहळा सुरु आहे. मंडळाचे बहुतेक सदस्य आरतीला उपस्थित असतात. नदीत निर्माल्य टाकणाऱ्यांना अटकावाचेही काम करत असतात. घाटाची स्वच्छता करतात. आरती परंपरेत लोकसहभाग वाढावा यासाठी घाटावर येणाऱ्या पर्यटकांनाही आरतीमध्ये सामावून घेत त्यांच्या हस्ते पंचगंगेची आरती केली जाते. वाढदिवस असलेल्यांनाही आरतीला बोलवतात. सध्या चंद्रकांत हांडे, सुधाकर भांदिगरे, दिलीप केळी व माणिकलाल विभुते हे आरतीची जबाबदारी सांभाळत आहेत. जिवंत तोपर्यंत पंचगंगेचे ऋण आरतीतून व्यक्त करतच राहणार, असा त्यांचा निर्धार आहे.
पंचगंगा आरती भक्त मंडळातून आरती करणाऱ्यांमध्ये काही नोकरदार तर काही सेवानिवृत्त आहेत. घरची जबाबदारी सांभाळत सर्व पंचगंगा नदीच्या आरतीसाठी घाटावर जमतात. आरतीपूर्वी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य नदीवरील मंदिरातील देवदेवतांना जलाभिषेक करतात. त्यानंतर पंचारतीने नदीची आरती केली जाते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास संजय गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ उभे राहून नदीची आरती केली जाते. आरतीतून आम्हाला श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग संवर्धनाची अनुभूती मिळत आहे.
राजाभाऊ कुंभार (अध्यक्ष : पंचगंगा आरती भक्त मंडळ)