पीएलआयअंतर्गत 14 हजार कोटी रक्कम वितरीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सरकारने उत्पादन आधारित सवलतीअंतर्गत म्हणजेच पीएलआय योजनेअंतर्गत 14 हजार 20 कोटी रुपये या वितरित केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मा या क्षेत्रांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. देशांतर्गत उत्पादनाला वाव मिळावा या उद्देशाने पीएलआय योजना सरकारने आणली होती. 2021 मध्ये सरकारने पीएलआय योजनेची घोषणा केली असून ती 14 क्षेत्रांसाठी लागू केली आहे. यामध्ये दूरसंचार क्षेत्र, व्हाईट गुड्स, टेक्स्टाईल, वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, ऑटोमोबाईल क्षेत्र, स्पेशालिटी स्टील उत्पादन, खाद्य उत्पादन, उच्च दर्जाची सोलार पीव्ही मॉड्यूल्स, आधुनिक रासायनिक सेल बॅटरी, ड्रोन आणि औषध क्षेत्र यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण क्षेत्रासाठी एकंदर 1.97 लाख कोटी रुपये योजनेअंतर्गत वितरणाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
10 क्षेत्रांना दिली रक्कम
वर उल्लेख केल्याप्रमाणे 14020 कोटी रुपयांची रक्कम सवलतीअंतर्गत सरकारने 10 क्षेत्रांना वितरीत केली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती, आयटी हार्डवेअर, औषधे, वैद्यकीय उपकरणे, दूरसंचार आणि नेटवर्किंगची उत्पादने, खाद्य प्रक्रिया उद्योग, ऑटोमोबाइल व ऑटो सुटे भाग तसेच ड्रोन्स यासारख्या क्षेत्रातील कंपन्यांनी पीएलआय योजनेचा उपयोग करुन घेतला आहे.