नव्या विमा प्रीमियम व्यवसायात 14 टक्के वृद्धी
35 हजार 20 कोटी रुपये प्राप्त : विमा घेण्याकडे ग्राहकांचा वाढता कल
वृत्तसंस्था/ चेन्नई
नव्या विमा प्रीमियममध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यात 14 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जीवन विमा क्षेत्रामध्ये प्रीमियममध्ये 14 टक्के इतकी वाढ सप्टेंबर महिन्यामध्ये नोंदली गेली आहे. यायोगे जीवन विमाच्या प्रीमियमच्या माध्यमातून सप्टेंबरमध्ये 35 हजार 20 कोटी रुपये प्राप्त करण्यात यश आलं आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात नव्या प्रीमियम व्यवसायाच्या माध्यमातून 30716 कोटी रुपये मिळवण्यात आले होते. जीवन विमा कौन्सिलने या संदर्भातली माहिती दिली आहे
नव्या पॉलिसी घेण्याचे प्रमाण वाढले
आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये प्रीमियम व्यवसायातून 1 लाख 89 हजार 214 कोटी रुपये प्राप्त करण्यात आले आहेत. वर्षाच्या आधारावर पाहता 19 टक्के इतकी वाढ त्यामध्ये पहायला मिळाली आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये 1 लाख 58 हजार 377 कोटी रुपये प्रीमियममधून मिळवण्यात आले होते.
नव्या पॉलिसी विमा व्यवसायामध्येसुद्धा वर्षाच्या आधारावर पाहता 45 टक्के इतकी वाढ झाली आहे. नव्या पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मागच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढीव दिसून आली आहे. जवळपास 32 लाख 17 हजार 880 पॉलिसीज ग्राहकांनी खरेदी केल्या आहेत.
एलआयसी आघाडीवर
जीवन विमाअंतर्गत सिंगल प्रीमियम पॉलीसी घेण्याच्या प्रमाणात 13 टक्के वाढ झाली असून 5142 कोटी रुपये सप्टेंबरमध्ये प्राप्त झाले आहेत. एलआयसी या कंपनीने प्रीमियमच्या माध्यमातून 20369 कोटी रुपये मिळवले आहेत. या तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये एलआयसीने 18126 कोटी रुपये नव्या प्रीमियममधून मिळवले होते. खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांनी मिळून नव्या प्रीमियम व्यवसायामध्ये 12 टक्के वाढ नोंदवली असून 73 हजार 664 कोटी रुपये मिळवले आहेत.