गुजरातमध्ये ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
एनसीबी-एटीएसची संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ 14 पाकिस्तानी नागरिकांना सुमारे 80 किलो ड्रग्जसह पकडले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि गुजरात एटीएस यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर माहितीच्या आधारे यंत्रणांकडून कारवाई सुरू होती.
भारतीय तटरक्षक दलाने ट्विटरवर या कारवाईची माहिती दिली आहे. गुजरात एटीएस आणि एनसीबीने समुद्रात रात्रभर केलेल्या कारवाईत पश्चिम अरबी समुद्रात एक पाकिस्तानी बोट पकडल्याचे सांगण्यात आले. यामध्ये 14 पाकिस्तानी नागरिक होते. त्यांच्याकडून 80 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 600 कोटी ऊपये असल्याचे सांगण्यात आले.
गुजरातच्या सागरी हद्दीत यापूर्वीही मोठ्या कारवाया झाल्या आहेत. यावषी फेब्रुवारी महिन्यात एनसीबी आणि भारतीय नौदलाने गुजरातच्या किनारपट्टीजवळ आजपर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली होती. त्यावेळी संयुक्त कारवाईत 3 हजार 132 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत 1,000 कोटींहून अधिक होती. नौदलाने भारतीय हद्दीत प्रवेश केलेले जहाज ताब्यात घेत पाच जणांना अटक केली होती.
गेल्या दोन वर्षांत भारतीय नौदलाने एनसीबीच्या सहकार्याने हिंदी महासागरात तीन मोठ्या कारवाया केल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये एनसीबी आणि भारतीय नौदलाने गुजरातच्या किनाऱ्याजवळ एक जहाज जप्त करत दोन क्विंटलपेक्षा जास्त मेथाम्फेटामाइन जप्त करण्यात आले. त्यानंतर मे 2023 मध्ये, एका पाकिस्तानी जहाजातून किमान 12 हजार कोटी ऊपयांचे 2,500 किलो मेथाम्फेटामाईन जप्त केले होते.