काँगोमध्ये विमान अपघातात 14 ठार
मृतांमध्ये दोन लष्करी अधिकारी : तांत्रिक बिघाडामुळे अपघात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँगोमध्ये झालेल्या विमान अपघातात किमान 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काँगोच्या लष्कराने शनिवारी या अपघाताची अधिकृत माहिती दिली. अपघातग्रस्त विमान नैऋत्य काँगोमधील किक्विट शहरातून राजधानी किंशासाकडे परत येत होते. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि केंगे परिसरात ते कोसळले. यात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. लेफ्टनंट जनरल मुटोंबो कातालायी टिएंडे आणि लेफ्टनंट जनरल बाकुमी लिकुलिया यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. टिएंडे हे लष्करी न्यायालयाचे प्रमुख होते, तर लिकुलिया सशस्त्र दलांचे महालेखा परीक्षक म्हणून कार्यरत होते. लष्कराच्या निवेदनानुसार विमानातील एकही प्रवासी वाचला नाही. या दोन जनरल अधिकाऱ्यांव्यतिरिक्त शिष्टमंडळाचे 12 सदस्य आणि विमानातील कर्मचारी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आल्याचे काँगोच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे अध्यक्ष ट्रिफोन किन-की मुलुम्बा यांनी सांगितले.