इम्रानखान याला 14 दिवसांची कोठडी
इस्लामाबाद :
पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान याला आणखी एका भ्रष्टाचार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सध्या इम्रानखान अल् कादीरी संस्था भ्रष्टाचार प्रकरणात कारागृहातच आहे. त्यात आता या प्रकरणाचाही समावेश झाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. इम्रानखान याच्यासमवेत त्याची पत्नी बुशरा बिबी ही देखील आरोपी आहे. गेल्या रविवारी या नव्या प्रकरणात इम्रानखान यांची पाकिस्तानातील भ्रष्टाचार विरोधी विभागाने चौकशी केली होती. हे नवे प्रकरण अल् कादीर प्रकरणाशी संबंधित असून या एकंदर प्रकरणात इम्रानखानवर 19 कोटी पौंडांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ब्रिटनमधील एका बिल्डरला अटक करण्यात आली होती. ब्रिटनमध्येच या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर तेथील सरकारने या बिल्डरची मालमत्ता जप्त करुन प्रकरण पाकिस्तानकडे पाठविले होते. इम्रानखानचा संबंधही या प्रकरणात त्याचवेळी उघड झाला होता. इम्रानखानचे सरकार पडल्यानंतर नव्या सरकारने हे प्रकरण धसाला लावण्याचा प्रयत्न चालविला असून इम्रानखान गेले वर्षभर कारागृहातच डांबला गेला आहे.