इस्रायलच्या हल्ल्यात 138 इराणी ठार
दुसऱ्या दिवशीही आण्विक केंद्रांवर हल्लासत्र : इराणने 150 क्षेपणास्त्रे, 100 ड्रोन डागले
वृत्तसंस्था/ तेहरान, तेल अवीव
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या 24 तासांत इराणमध्ये 138 लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 10:30 वाजता इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर दुसऱ्यांदा लढाऊ विमानांनी हल्ला केला. या हल्ल्यात 60 लोकांचा मृत्यू झाला. तर 350 हून अधिक लोक जखमी झाले. यापूर्वी शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता इराणमध्ये झालेल्या हल्ल्यात 78 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 हून अधिक इराणी कमांडर यांचा समावेश होता.
शुक्रवार रात्री हल्ल्यानंतर इराणने लगेचच प्रत्युत्तर देत इस्रायलच्या दिशेने 150 हून अधिक क्षेपणास्त्रs डागली. राजधानी तेल अवीवमध्ये 6 क्षेपणास्त्रs पडल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. यात 90 हून अधिक लोक जखमी झाले. हे क्षेपणास्त्र इस्रायली संरक्षण मंत्रालयावरही पडल्याचा दावा केला जात आहे. तथापि, इस्रायलने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर अनेक विमाने उद्ध्वस्त झाली आहेत. इस्रायलने शुक्रवारी रात्री येथे अनेक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
पोप लिओ यांचे समेटाचे आवाहन
पोप लिओ यांनी इराण आणि इस्रायलच्या नेत्यांना संवादातून समेट घडवून आणण्याचे आवाहन केले. सेंट पीटर्स बॅसिलिका येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अशा नाजूक क्षणी मी दोन्ही देशांना जबाबदारीने आणि तर्कशुद्धतेने कृती करण्याचे आवाहन करू इच्छितो, असे पोप म्हणाले. कोणीही कधीही दुसऱ्याचे अस्तित्व धोक्यात आणू नये, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
इस्रायलच्या हल्ल्यात 9 इराणी अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू
इस्रायली सैन्याने शुक्रवारी सकाळी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईच्या सुरुवातीला मारल्या गेलेल्या नऊ इराणी अणुशास्त्रज्ञांची नावे जाहीर केली आहेत. या शास्त्रज्ञांनी अणुबॉम्ब बनवण्याच्या इराणच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा इस्रायली सैन्याचा दावा आहे. या शास्त्रज्ञांना अनेक ठिकाणी एकाच वेळी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले होते, असे आयडीएफने म्हटले आहे. ठार झालेले सर्व शास्त्रज्ञ इराणच्या अणु कार्यक्रमाचा कणा मानले जात होते. त्यांना कित्येक दशकांचा एकत्रित अनुभव होता.
इस्रायलचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद
इराणशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने देशातील सर्वात मोठे आणि व्यस्त बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केले आहे. विमानतळ प्राधिकरणाने शनिवारी ही माहिती दिली. शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून तेल अवीवजवळील बेन गुरियन विमानतळ बंद आहे.
इस्रायलमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा सल्ला
इस्रायलमधील भारतीय दूतावासाने शनिवारी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. यासोबतच, इस्रायल सरकारने जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. भारताने आपल्या नागरिकांना इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित आश्रयस्थानांजवळ राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय लोकांच्या सुरक्षेवर ते सतत लक्ष ठेवत असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. इस्रायलमध्ये सद्यस्थितीत 18,000 ते 20,000 भारतीय नागरिक राहतात. यासाठी दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबबत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणच्या विदेशमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
इस्रायलकडून 200 लढाऊ विमानांनी अनेक इराणी तळांवर हल्ला
इस्रायलने या मोहिमेला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले
इस्रायलच्या कारवाईत 9 इराणी शास्त्रज्ञ, 20 लष्करी कमांडर ठार
इराणचा प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ला, मात्र बहुतांश हल्ले रोखले
इराणने ‘ट्रू प्रॉमिस थ्री’ मोहिमेत 150 हून अधिक क्षेपणास्त्र डागली
इराणचा इस्रायली संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला
नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून परिस्थितीची माहिती दिली
अणुकरार न केल्यास मोठा हल्ला : डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
ठार झालेल्या शास्त्रज्ञांची नावे जाहीर
- फरीदून अब्बासी - अणु अभियांत्रिकी तज्ञ
- मोहम्मद मेहदी तेहरानची - भौतिकशास्त्र तज्ञ
- अकबर मुतलेबी जादेह - रासायनिक अभियांत्रिकी तज्ञ
- सईद बर्जी - मटेरियल इंजिनिअरिंग तज्ञ
- अमीर हसन फकाही - भौतिकशास्त्र तज्ञ
- अब्दुल-हमीद मिनुशेहर - अणुभट्टी भौतिकशास्त्र तज्ञ
- मन्सूर असगारी - भौतिकशास्त्र तज्ञ
- अहमद रझा झोल्फाघारी दरयानी - अणु अभियांत्रिकी तज्ञ