1371 पानांचे आरोपत्र दाखल
पणजी : रामा काणकोणकर मारहाण प्रकरणात पणजी उपविभागीय अधिकारी सुदेश नाईक यांनी तपासकाम पूर्ण करून साठ दिवसांच्या आत 1 हजार 371 पानी आरोपत्र उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यात 49 साक्षीदारांची साक्ष नोंद करून आरोपपत्राला जोडल्या आहेत. 18 सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांना करंजाळे बालोद्यानाजवळ मारहाण झाली होती.त्यानंतर पणजी पोलिसांनी गुन्हा क्रमांक 125/2025, अनुसूचित जाती/जमाती कायदा 1989 कलम 126(1),109, 351(3), 238, 111 आर/डब्ल्यू 3(5) आणि 61 भारतीय न्याय संहिता कलम आर/डब्ल्यू 3(1)(अ), 3(1)(आर), 3(1)(एस) आणि 3(2)(व्ही) अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.
या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून उपअधिक्षक सुदेश नाईक यांनी तपासकाम केले आहे. संशयित जेनिटो कार्दोझ (वय 36) याच्यासह अँथनी नादार (31), फ्रान्सिस नादार (28), मिंगेल आरावजो (24), मनीष हडफडकर (24), सुरेश नाईक (31), फ्रांको डिकॉस्ता आणि साईराज गोवेकर (28) यांना अटक केली होती. सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान संशयित फ्रान्सिस नादारने उघड केले की त्याने आणि त्याच्या साथीदारांनी रामा काणकोणकरवर केबल वायरने हल्ला केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर शेण लावले, हे वैयक्तिक द्वेष आणि ऑनलाईन थट्टा यातून रचलेल्या कटाचा भाग होता. तसेच ही योजना जेनिटो कार्दोझ यांनी आखली होती, जो रामाच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता आणि व्हॉट्सअॅपद्वारे संवाद साधत होता. असे त्याने मान्य केले असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.