बीड येथील तेराशे वर्षांपूर्वीची दगडी गणेशमूर्ती; लखलखाट नाही.. दणदणाट नाही, पण या मूर्तीला तोड नाही
सुधाकर काशीद
कोल्हापूर: गणेश उत्सव सोहळ्यात वेगवेगळ्या गणेश मूर्ती, देखावे, झगमगाट, लखलखाट नक्कीच पाहायला मिळेल. पण अनेकांना माहीत नाही, कोल्हापूरपासून फक्त १६ किलोमीटरवर बीड या गावी २१ फूट नव्हे... सोन्या चांदीने मढवलेली नव्हे... डीजे लावून हजारभर पोरांनी नाचवत आणलेली मूर्ती नव्हे...पण तब्बल १२ व्या शतकातील म्हणजे साधारण तेराशे होय. तेराशे वर्षांपूर्वीची साडेपाच फुटाची दगडी मूळ गणेश मूर्ती पाहायला मिळणे हे खूप मोठे भाग्य आहे.
पण गणेश सोहळा म्हणजे झगमगाटच असला पाहिजे असे वाटणाऱ्या आजच्या पिढीला या आपल्या मूर्तीचे महत्त्व आणखी समजावून सांगण्याची गरज नक्कीच निर्माण झाली आहे. गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती, संस्कृती, ज्ञान याचा आनंद सोहळा पण कान फाटणाऱ्या आवाजाचा डीजे लावून आणलेली, पाच-सहा हजार तरुण तरुण देहभान हरपून नाचत असलेली मूर्ती मी पाहून आलो हे सांगण्याचा या पिढीला अभिमान आहे. पण आपल्या कोल्हापुरात किंवा कोल्हापूरपासून १६
बीड येथील तेराशे वर्षांपूर्वीची दगडी गणेशमूर्ती आजही अस्तित्वात आहे. बीड या गावातील रहिवाशांनी श्रद्धेने जपलेली आहे. पण गणेशोत्सव म्हणजे दणदणाट एवढाच समज करून बसलेल्या या पिढीसाठी कोल्हापुरातील अनेक अभ्यासकांनी या मूर्तीची माहिती सर्वांना कळावी यासाठी धडपड सुरू ठेवली आहे.
बीड (तालुका करवीर) हे गाव कोल्हापूर पासून पश्चिमेस १६ किलोमीटरवर आहे. पटणार नाही हे बीड गाव म्हणजे तेराशे वर्षांपूर्वी शिलाहारकालीन राजधानीचे ठिकाण होते. या शीलाहारांच्या राज्याचा देव महादेव. त्यामुळे राजवाड्यासमोर महादेवाचे मंदिर आणि या मंदिरात ही शिलाहारकालीन ही गणेश मूर्ती आहे. या क्षणाला इतकी प्राचीन मूर्ती कोल्हापुरात कोठेही नाही असा मूर्ती अभ्यासक उमाकांत राणींगा यांचा दावा आहे अन् तो खराही आहे.
गणेशोत्सव सोहळ्यात अशा मूर्तीच्या दर्शनासाठी खरोखर रांग लागणे आवश्यक आहे. पण जिथे दणदणाट लखलखाट तेथे एकमेकांच्या उरावर बसणारी गर्दी आहे. परंतु तेराशे वर्षांपूर्वीची गणेश मूर्ती पाहायला मात्र अनेकांना सवड नाही किंवा अशी मूर्ती आहे हे माहिती नसणे हे आपला सांस्कृतिक ऱ्हास झाल्याचे लक्षण
आहे.
अनेकांना माहित नाही बीड हे गाव म्हणजे शिलाहार राजाची राजधानी होती. तेथे नाणे पाडणारी टांकसाळ होती. या नाण्याला बेडा असे म्हणतात. हरभऱ्याच्या डाळी एवढ्या आकाराची नाणी आजही या परिसरात सापडतात. अनेक लोकांच्या देव्हाऱ्यात अशी नाणी पूजलेली आहेत. बीड हे सांस्कृतिक वैभव नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचे हे सांस्कृतिक वैभव आहे. पण शंभर टक्के दोष लोकांचा नाही. कारण आपण त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने याची माहितीच दिले गेलेली नाही.