13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा सर्व बिहारींसाठी अभिमानास्पद
वृत्तसंस्था/पाटणा, बिहार
बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या महालिलावात राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केलेल्या राज्यातील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) करारबद्ध होणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. 30 लाखांची आरंभ बोली लाभलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाला राजस्थान रॉयल्सने महालिलावादरम्यान 1.10 कोटी ऊपयांना करारबद्ध केले. सर्व बिहारींसाठी ही अभिमानाची बाब आहे. तो एक अतिशय हुशार मुलगा आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटेल. आमची संघनिवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही त्याला पाहिले होते तेव्हाच एक दिवस त्याच्याविषयी बिहारला अभिमान वाटेल याची कल्पना आली होती, असे राकेश तिवारी यांनी सांगितले.
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये त्याला संघात स्थान देण्यासाठी बोली युद्ध लागले होते. शेवटी राजस्थानने 1.1 कोटी ऊपयांची विजयी बोली लावून बाजी मारली होती. 12 व्या वर्षी बिहारतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या त्याने गेल्या महिन्यात चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या भारताच्या यू-19 सामन्यात शतक झळकावले होते. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी वैभवच्या प्रवासाला आकार देण्याच्या बाबतीत राकेश तिवारींच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. जर राकेश तिवारी नसते, तर माझ्या मुलाला बिहारसाठी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली असती असे मला वाटत नाही. आर्थिक अडचणींमुळे आम्हाला आमची जमीनही विकावी लागली, पण वैभवसाठी मी आनंदित आहे. तो अजूनही लहान आहे आणि आपण कुठला मोलाचा टप्पा गाठला आहे हे कदाचित त्याला आता समजणार नाही, असे संजीव सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.