कारखान्यातील स्फोटात हैदराबादेत 13 कामगार ठार
शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज : मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे एका रासायनिक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान 13 कामगारांचा मृत्यू झाला आहे. सिगाची फार्मा कंपनी असे या कारखान्याचे नाव आहे. या कारखान्याच्या फेज 1 युनिटमध्ये ही घटना सोमवारी घडली. घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेसंबंधी दु:ख व्यक्त करणारा संदेश प्रसिद्ध केला आहे.
स्फोटाचे नेमके करण स्पष्ट झालेले नाही. मात्र, तो शॉर्ट सर्किटमुळे झाला असावा, अशी प्राथमिक माहिती दिली गेली आहे. स्फोटाची घटना घडल्यानंतर त्वरित बचाव कार्याला प्रारंभ करण्यात आला. आपत्कालीन साहाय्यता दलांच्या तुकड्या घटनास्थळी पाठविल्या गेल्या. केंद्र सरकारनेही साहाय्य करण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. बचावकार्याला त्वरीत प्रारंभ करण्यात आल्याने काही जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून उपचार केले जात आहेत.
केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्यता
या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येक मृतामागे 2 लाख रुपयांची भरपाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे. प्रत्येक जखमी व्यक्तीला 50 हजार रुपये उपचारांच्या खर्चासाठी केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनीही या घटनेसंबंधात दु:ख व्यक्त करणारा संदेश पोस्ट केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr यांनी शोक व्यक्त केला असून घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.