आत्मघाती बॉम्बस्फोटात पाकमध्ये 13 जवान ठार
स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर धडकवले
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिह्यात शनिवारी एका आत्मघाती हल्लेखोराने लष्करी ताफ्यावर हल्ला केला. यात 13 जवान ठार झाले. तर 10 सैनिक आणि 19 नागरिक असे एकूण 29 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान-तालिबानशी (टीटीपी) संबंधित हाफिज गुल बहादूर गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. खैबर प्रांत हा टीटीपीचा बालेकिल्ला मानला जातो. दहशतवादी संघटना टीटीपीने यापूर्वी 24 जून रोजी दक्षिण वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केल्याने 2 लष्करी अधिकारी ठार झाले होते.
हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवल्यामुळे मोठा स्फोट झाल्याचे खैबर पख्तूनख्वा येथे तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हा स्फोट शक्तिशाली होता. वाहनांमधील वस्तू दोन घरांच्या छतांवर पडल्यामुळे सहा मुले जखमी झाली. तसेच लष्करी वाहनातील बहुतांश जवान घटनास्थळीच मृत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या स्फोटानंतर जखमी झालेल्या जवान आणि नागरिकांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.