जूनमध्ये सरासरी 13 टक्के कमी पाऊस
पणजी : राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. यंदा जूनमध्ये केवळ 31.75 इंच पावसाची नोंद झाली. प्रत्यक्षात ती 36.50 इंच होणे आवश्यक होते. जूनमध्ये सरासरी 13 टक्के पाऊस कमी झाला आहे. गोव्यात जूनच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण फारच ओसरले. या महिन्याच्या अखेरीस 30 जून रोजी एकंदर पावसाची नोंद 31.75 इंच एवढी झाली आहे. उत्तर गोव्यात 32 इंच तर दक्षिण गोव्यात 31 इंच पाऊस झाला आहे. सरासरी उत्तर गोव्यात एव्हाना 37 इंच पाऊस पडतो. यावर्षी उत्तर गोव्यात 14 टक्के पाऊस कमी झाला. दक्षिण गोव्यात 31 इंच पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो 36 इंच एवढा पाऊस पडतो. दक्षिण गोव्यात 12 टक्के कमी पाऊस पडलेला आहे. गेल्या 24 तासांत फोंडा 1.50 इंच, सांगे 1.25 इंच, धारबांदोडा 1.15 इंच, वाळपई, दाबोळी, केपे, जुने गोवे इत्यादी केंद्रांमध्ये पाऊण इंच तर पणजी, सांखळी, म्हापसा या ठिकाणी प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण, मडगाव व मुरगाव या ठिकाणी 1 सेंमी पेक्षाही कमी पाऊस पडला.
पुढील सात दिवस यलो अलर्ट
जुलैमध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस संततधार कोसळत असतो. परंतु सध्या मान्सून जास्त सक्रिय नाही. पुढील सात दिवसांमध्ये म्हणजे दि. 6 जुलैपर्यंत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान, एखाद्या ठिकाणी मुसळधार तर सर्वसामान्य असा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहील आणि वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 60 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पारंपरिक मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.