मालवाहू जहाज बुडाल्याने 4 भारतीयांसह 13 बेपत्ता
एका क्रू मेंबरला वाचविण्यात यश
वृत्तसंस्था/ इस्तंबूल
ग्रीसजवळील लेसबोस बेटावर वादळात अडकल्याने रविवारी मालवाहू जहाज बुडाले. या अपघातात 4 भारतीयांसह 13 क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत. रॅप्टर जहाजात 6 हजार टन मीठ होते. हे मीठ इस्तंबूलहून इजिप्तच्या अलेक्झांड्रियाला नेले जात होते. तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर जहाजाने मदतीचा संदेश पाठवला होता. यानंतर बचाव पथक पोहोचले आणि त्यांनी एका इजिप्शियन नागरिकाला वाचवले. इतर लोकांचा शोध सुरू आहे. जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
कोमोरोस ध्वजांकित बुडालेल्या मालवाहू जहाजात एकूण 14 कर्मचारी होते. त्यापैकी एकाला वाचविण्यात आले आहे. सध्या या जहाजावरील इतर लोकांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तटरक्षक दलाची तीन जहाजे आणि हवाई दल आणि नौदलाची हेलिकॉप्टर बचावकार्यात तैनात करण्यात आली आहेत. वाचविण्यात आलेल्या एका क्रू मेंबरला लेस्बॉस जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जोरदार लाटांमुळे जहाज पाण्यावर आदळल्यानंतर बुडाल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी जूनमध्ये शेकडो स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट ग्रीसच्या किनाऱ्याजवळ उलटून 79 जणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ग्रीक तटरक्षक दलाने बचाव मोहीम राबवून 104 स्थलांतरितांना वाचवले होते.