पर्यटक विमान कोसळून 13 जणांचा मृत्यू
पेरूमध्ये नाझ्का शहराजवळ दुर्घटना : सर्व पर्यटक युरोपमधील
वृत्तसंस्था
नाझ्का
पेरूमधील नाझ्का शहराजवळ रविवारी एक पर्यटक विमान कोसळले. या अपघातात 11 युरोपियन पर्यटकांसह 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात इटालियन, दोन स्पॅनिश आणि दोन जर्मन नागरिकांचा समावेश होता. पायलट आणि को-पायलट यांचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला. पेरू सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातग्रस्त विमान पेरूच्या ‘एरोडियाना’ कंपनीचे होते. एअरलाइनच्या वेबसाइटनुसार, ते गेल्या 14 वर्षांपासून सेसना ग्रँड कॅराव्हॅन विमानांचा वापर करून नाझ्का लाइन्सवरून निसर्गरम्य हवाई सफरी घडवत होते.
दुर्घटनाग्रस्त विमान इका शहरातून निघाले होते. यात स्वार असलेल्या पर्यटकांना 2,000 वर्षे जुन्या नाझ्का रेषा दाखवण्यासाठी नेले जात होते. नाझ्का रेषांजवळ पोहोचल्यानंतर विमान एका शेतात कोसळल्यानंतर त्याला आग लागली. अपघातानंतर विमानाच्या अवशेषांजवळ जळालेले मृतदेह विखुरलेले होते. अपघातानंतर पेरूचे राष्ट्राध्यक्ष केइको फुजीमोरी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून नाझ्का विमानतळाचे कामकाज तात्पुरते स्थगित करण्याचाही विचार सुरू आहे.