For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडाल्कोकडे 13 कोटींचे पाणी बिल थकीत

11:21 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडाल्कोकडे 13 कोटींचे पाणी बिल थकीत
Advertisement

राकसकोप जलाशयाचे गेट नादुरुस्त, त्वरित पाहणीची सूचना 

Advertisement

बेळगाव : पाणीपुरवठा महामंडळाकडून हिंडाल्को फॅक्टरीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्यांच्याकडे 13 कोटी रुपये पाण्याचे बिल येणे बाकी आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने पाण्याचे बिल थकले आहे, असे मनपा अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. नगरसेवक रवी धोत्रे यांनी पाणीपुरवठा महामंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हिंडाल्कोला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र फॅक्टरीकडून वाणिज्य दरानुसार बिल अदा केले जात नाही. शेजारील मुत्यानट्टी, बसवनकोळ्ळ आदी भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने इतरांप्रमाणेच पाण्याचे बिल आकारण्यात यावे, अशी मागणी हिंडाल्को फॅक्टरीकडून करण्यात येत आहे. यामुळे बिल थकले आहे. सदर प्रकरण न्यायालयात गेले असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्याकडून 13 कोटींचे बिल थकीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

राकसकोप येथील जलाशयाचे गेट व्यवस्थितरित्या काम करत नसून त्याची तत्काळ पाहणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढून समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेऊन गेटची पाहणी करावी व पुढील कार्यवाही करावी, अशी सूचनाही अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. आरोग्य विभागाकडून आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला असून चिकुनगुनिया, डेंग्यू यासारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आजारी असलेल्या नागरिकांची तपासणी करून रक्ताचे नमुने प्रयोगालयाला पाठविण्यात आले होते. जानेवारी ते आतापर्यंत 315 जणांचे नमुने घेण्यात आले असून 12 जणांना डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

एकाच कामाची दोनवेळा पूजा!

एकाच कामाची दोनवेळा पूजा करण्यात आल्यावरून मनपा बैठकीत महापौरांसह नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सदाशिवनगर येथील विकासकामांसाठी मनपाकडून निधी मंजूर झाला असताना आमदारांच्या पुत्रांकडून कामाचे पूजन करण्यात आल्याबद्दल नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. महापौरांनीही यावर आक्षेप घेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महापौर, नगरसेवकांची काहीच किंमत नसेल तर अधिकाऱ्यांनी आमदार, खासदारांना घेऊनच काम करावे, असे बजावून सांगण्यात आले. यावरून बैठकीमध्ये चांगलाच वाद रंगला.

Advertisement
Tags :

.