बिष्णोई संबंधित 13 गुन्हेगारांना अटक
चंदिगड : कुख्यात समाजकंटक आणि पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप असणारा लॉरेन्स बिष्णोई तसेच हरविंदर रिंडा यांच्या टोळीतील 13 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पंजाबचे इनस्पेक्टर जनरल सुखचैन सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सर्वांचा मुसेवाला यांच्या हत्येत हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जालंदर जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात या गुन्हेगारांचे वास्तव्य होते. त्यांना पाळत ठेऊन पकडण्यात आले. अटक पेलेल्या सर्व व्यक्तींचे प्रदीर्घ काळापासून गुन्हेगारी जगताशी संबंध असून त्यांच्यावर नावावर अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
लुधियाना, अमृतसर, फिरोजपूर, तरणतारण, जालंधर, खन्ना, मोहाली आणि पतियाळा आदी जिल्हय़ांमध्ये त्यांनी बरेच गुन्हे केले आहेत. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर मुसेवाला यांच्या मृत्यूसंबंधी आणखी माहिती मिळू शकेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पंजाबमधील लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्याच्या आरोपाखाली लॉरेन्स बिष्णोई याला अटक करण्यात आली आहे. त्याने सुपारी घेऊन हत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. आतापर्यंत त्याच्या अनेक सहकाऱयांना अटक करण्यात आली असून लवकरच मुसेवाला यांच्या हत्येचे गूढ उकलणार आहे, असा दावा पंजाब पोलिसांनी केला. मुसेवाला यांची सुरक्षा कमी केल्यामुळे मारेकऱयांना त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली असा आरोपी केला जात असून पंजाब सरकारकडे बोट दाखविले जात आहे.