For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्याचा बारावी निकाल 77.20 टक्के

11:10 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्याचा बारावी निकाल 77 20 टक्के
Advertisement

राज्यात बेळगाव शैक्षणिक जिल्हा 27 व्या स्थानी : निकालात सुधारणा; मात्र क्रमवारीत घसरण : विद्यार्थिनींची बाजी

Advertisement

बेळगाव : मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेला बारावीचा निकाल अखेर बुधवारी सकाळी 11 वाजता जाहीर झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 77.20 टक्के इतका लागला असून राज्यात 27 व्या स्थानी घसरण झाली आहे. निकालात सुधारणा झाली असली तरी क्रमवारीत घसरण झाल्याने पदवीपूर्व शिक्षण विभागाला पुढीलवर्षी तरी सुधारणेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्यात 1 मार्चपासून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली होती. यामुळे कोठेही कॉपीचे प्रकार घडले नव्हते. बुधवार दि. 10 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना अद्याप सीईटी, नीट, जेईई परीक्षा द्यायच्या असल्याने त्यांच्यामध्ये बारावीच्या निकालाबाबत इतकी उत्सुकता नव्हती. परंतु,

कॉमर्स व आर्ट्स विभागाच्या विद्यार्थ्यांना निकालाची हुरहुर लागली होती. लोकसभा निवडणुकांपूर्वी परीक्षांचे निकाल देण्यासाठी यावर्षी पदवीपूर्व शिक्षण विभागाने सुरुवातीपासूनच जोरदार प्रयत्न केले होते. यावर्षी शैक्षणिक जिल्ह्यात 20 हजार 795 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 16 हजार 053 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 77.20 टक्के इतका लागला आहे. विज्ञान विभागाचा 87.25 टक्के, वाणिज्य विभागाचा 78.54 तर कला शाखेचा 66.05 टक्के इतका निकाल लागला आहे. यावर्षी पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. 64.76 टक्के विद्यार्थी तर 80.64 टक्के विद्यार्थिनी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. मागीलवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 73.98 टक्के लागला होता. यावर्षी मात्र निकालात वाढ झाली आहे. निकाल वाढला असला तरी राज्यात क्रमवारीत बेळगाव जिल्हा मागे आहे. यावर्षी बेळगाव जिल्ह्याला 27 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. शेजारील विजापूर, मंगळूर, उडुपी हे जिल्हे पहिल्या पाचमध्ये असताना बेळगाव जिल्ह्याचा निकाल खालावला असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Advertisement

जिल्ह्यातील विद्यार्थिनी राज्यात पाचव्या स्थानी

बेळगाव जिल्ह्यातील दोन विद्यार्थिनींनी राज्यात पाचव्या स्थानी मजल मारली आहे. मुनवळ्ळी ता. सौंदत्ती येथील अन्नदानेश्वर पीयु कॉलेजची विद्यार्थिनी गंगव्वा ना. सुनदोळी हिने 592 गुण तर सौंदत्ती येथील कुमारेश्वर पीयु कॉलेजची विद्यार्थिनी विजयालक्ष्मी ओ. गुलगंजी हिनेही 592 गुण मिळवून राज्यात पाचवे स्थान पटकाविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी राज्यात पाचवे स्थान पटकाविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनुत्तीर्ण ऐवजी ‘एनसी’...

विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पदवीपूर्व शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ऑनलाईन निकालामध्ये यापूर्वी नापास असा उल्लेख केला जात होता. परंतु, विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार करून यावर्षीपासून पदवीपूर्व शिक्षण विभागाने यामध्ये बदल केला आहे. विद्यार्थी ज्या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत, त्या विषयावर ‘एनसी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘एनसी’ म्हणजे ‘नॉट कम्प्लिटेड’. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी अजून संधी उपलब्ध असून हताश न होता त्यांनी पुन्हा अभ्यास करावा, यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

पुनर्परीक्षेची संधी

बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याच्या टक्केवारीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. पुढीलवर्षी यापेक्षा अधिक निकाल लावण्यासाठी आतापासूनच तयारी केली जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना यश आले नाही, त्यांना पुनर्परीक्षेची संधी मिळणार आहे.

- एम. एम. कांबळे (पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)

Advertisement
Tags :

.