बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा ९३. ३७ टक्के तर कोल्हापूर विभाग ९४.२४ टक्के निकालासह तिसऱ्या स्थानावर
कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये राज्याचा ९३.३७ टक्के तर कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या निकालाशी तुलना करता यंदा कोल्हापूर विभागाचा निकाल १ टक्केंनी वाढला आहे. परंतू गतवर्षी कोल्हापूर विभाग राज्यात तिसऱ्या स्थानावर तर यंदा चौथ्या स्थानावर असल्याने राज्यात टक्का मसरला आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. येत्या काही दिवसातच बारावीच्या मूळ गुणपत्रकाबरोबर स्थलांतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुभाष चौगले आणि सहसचिव डी. एस. पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर विभागात १ लाख १४ हजार ३१९ पैकी १ लाख ७ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण होत ९४.२४ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४९ हजार २५० पैकी ४७ हजार ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ९५.६६ टक्के निकाल असून विभागात प्रथम क्रमांक आहे. तर सातारा जिल्ह्यात ३३ हजार ७८९ पैकी ३१ हजार ६३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ९३.६३ टक्के निकाल असून विभागात व्दितीय क्रमांक आहे. तसेच सांगली जिल्ह्यात ३१ हजार ३२० पैकी २९ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ९२.६८ टक्के निकाल असून विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे. यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात १ टक्केंनी निकाल वाढला आहे. पण राज्याशी तुलना करता १ टक्केने घसरण झाली आहे. कोल्हापूर विभागांतर्गत ११ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार सापडले होते, चौकशीअंती या विद्यार्थ्यांची संबंधीत विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. जे विद्यार्थी गुणांवर समाधानी नसतील त्यांनी २२ में ते ५ जून या कालावधीत गुण पडताळणीसाठी विहीत नमुन्यात प्रती विषय ५० रूपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. तर फोटो कॉपीसाठी ४०० रूपये शुल्क भरून अर्ज करतायेणार आहे.
राज्यासह कोल्हापूर विभागातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूर विभागात ५३ हजार ७८१ पैकी ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तुलनात्मकदृष्ट्या मुलापेक्षा ५.२३ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या गुणांविषयी तक्रार असल्यास कोल्हापूर विभागीय मंडळाकडे चौक्रार करावी, असे आवाहन अध्यक्ष सुभाषा चौगुले यांनी केले आहे. यावेळी विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंगण, सहाय्यक सचिव एस. बी. चव्हाण, प -भारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड, सांगली शिक्षणाधिकारी आर. एम. लोंढे, सातारा शिक्षणाधिकारी प्रतिनिधी तेजस गंवरे, लेखाधिकारी एन. डी. पाटील, अधिक्षक डी. पी. पोवार, एस. वाय. दुधगावकर, एम. आर. शिंदे, जे. आर. तिवले, एम. एम. वाघ आदी उपस्थित होते.
कोल्हापूर विभागातील २ हजार ३६१ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण
बारावी परीक्षेला बसलेले खेळाडू, एन. सी. सी., स्काऊट गाईडच्या २ हजार ३६१ विद्यार्थ्यांना नियमांच्या अधीन राहून सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश आहे.