बारावी ऑनलाईन परीक्षा होणार कॉपीमुक्त
कोल्हापूर :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवार 12 मार्चपासून बारावीच्या माहिती तंत्रज्ञान(आय टी) व सामान्य ज्ञान(जी के) विषयांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या सूचना कोल्हापूर विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी आणि केंद्रसंचालकांना दिल्या आहेत. ऑनलाइन परीक्षा असलेल्या सर्व संगणक प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे. केंद्रासाठी बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
12 ते 18 मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती झाली असून ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना आयटी विषय मान्यता देण्यात आली आहे, त्याच कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. जिल्ह्यातील खाजगी सैनिकी शाळेत सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची ऑनलाईन परीक्षाही ज्या त्या सैनिकी शाळेतच होणार आहे. कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी एक खाजगी सैनिकी शाळा आहे.
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (आय टी) हा विषय घेता येतो. कोल्हापूर विभागीय मंडळातील बारावीच्या 25,179 विद्यार्थ्यांनी हा वैकल्पिक विषय घेतला आहे. कोल्हापूर मंडळात 224 परीक्षा केंद्रांवर या विषयाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तर कोल्हापूर विभागातील तिन्ही सैनिकी शाळेतील बारावीच्या एकूण 88 व कोकण मंडळातील दोन सैनिकी शाळेतील 70 विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान या अनिवार्य विषयाची परीक्षा होणार आहे.
- जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे
माहिती तंत्रज्ञान विषयाकरता सातारा 71, सांगली 53, कोल्हापूर 100 अशी कोल्हापूर विभागात एकूण 224 परीक्षा केंद्र आहेत. तर या पाचही जिह्यात सामान्य ज्ञान विषयासाठी सैनिकी शाळेत प्रत्येकी एक परीक्षा केंद्र आहे. माहिती तंत्रज्ञान विषयाकरिता सातारा 8,360 सांगली 4,351 कोल्हापूर 12,468 असे कोल्हापूर विभागात 25,179 परीक्षार्थी प्रविष्ट होत आहेत.
- जिल्हा समन्वयकांची नियुक्ती
तांत्रिक मदतीसाठी कोल्हापूर विभागीय समन्वयक म्हणून सुषमा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हानिहाय आयटी समन्वय सातारा- विशाल शिंदे, किरण शिंदे, संपत चव्हाण. सांगली-धनाजी शेवडे, शांतिनाथ पाटील. कोल्हापूर-बी एम. वायकसकर, ज्योती गडगे, निलेश कांबळे. रत्नागिरी- समृद्धी बावधनकर. सिंधुदुर्ग- प्रसन्नकुमार मयेकर.