For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावीचा निकाल 92.96 टक्के

07:19 AM Mar 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
बारावीचा निकाल  92 96 टक्के
Advertisement

यंदाही मुलीच सरस : विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक यश

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

बारावीच्या परीक्षेत बाजी मारण्याची गत कित्येक वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवताना मुलींनी 93.93 टक्क्यांसह मुलांवर मात केली असून यंदा बारावीच्या एकूण निकालातही सुमारे 2.32 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या परीक्षेत एकूण 92.96 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात मुलांचा निकाल 91.89 टक्के तर मुलींचा निकाल 93.93 टक्के लागला आहे. हा संपूर्ण निकाल शालांत मंडळाची वेबसाईट (रिझल्टस्.जीबीएसएचएसईजीओए.एनईटी) तसेच डिजीलॉकर अॅप, यांच्या माध्यमांतून उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी दिली.

Advertisement

निकाल जाहीर करण्यासाठी शनिवारी पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सचिव विद्यादत्त नाईक, सहसचिव भारत चोपडे व सहसचिव श्रेया कासकर यांची उपस्थिती होती. गत फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला 9,080 मुली आणि 8,203 मुलांसह एकूण 17,283 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 16,067 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 7,538 (91.89टक्के) मुले आणि 8,529 (93.93 टक्के) मुलींचा  समावेश आहे. 23 टक्के निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

शाखानिहाय कामगिरीनुसार उत्तीर्ण होण्याचे प्रमाण विज्ञान शाखेत सर्वाधिक 93.90 टक्के नोंद झाले आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेत 92.90 टक्के, कला शाखेत 92.21 टक्के आणि व्यावसायिक शाखेत 92.27 टक्के असे प्रमाण आहे. 2,034 विद्यार्थ्यांनी 81 ते 100 टक्के श्रेणीत गुण मिळविले आहेत, तर बहुसंख्य 8,280 विद्यार्थ्यांनी 60 ते 80 टक्के गुण मिळवले. आणखी 5,201 विद्यार्थी 46 ते 59 टक्के श्रेणीत आले तर 550 विद्यार्थ्यांनी 33 ते 45 टक्के गुण मिळविले आहेत.

यंदा या परीक्षेत 139 खासगी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती, त्यातील 59 (42.45 टक्के) उत्तीर्ण झाले. फेरपरीक्षा देणारे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 48.80 टक्के राहिले. एकूण 888 दिव्यांग विद्यार्थी होते. त्यामधील 850 जण उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी 95.72 इतकी आहे.

पेडणे तालुक्याने मारली बाजी

तालुकावार निकालात 95.97 टक्क्यांसह पेडणे तालुक्याने बाजी मारली आहे. त्या खालोखाल सासष्टी तालुक्याने 95.17 टक्के उत्तीर्णतेसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. अन्य तालुक्यांमध्ये तिसवाडी (95.11 टक्के), बार्देश (95.02 टक्के), काणकोण (94.14 टक्के), डिचोली (92.95 टक्के), केपे (92.86 टक्के), मुरगांव (91.70 टक्के), फोंडा (90.01 टक्के), सांगे (82.78 टक्के), सत्तरी (79.80 टक्के) आणि धारबांदोडा (79.57 टक्के) यांचा समावेश आहे.

विशेष वर्गवारीत सर्वसाधारण गटात 12,843 विद्यार्थ्यांपैकी 11,941 उत्तीर्ण झाले, इतर मागासवर्गात 2410 पैकी 2254 उत्तीर्ण झाले, अनुसूचित जाती 309 पैकी 284 उत्तीर्ण झाले तर अनुसूचित जमातीमधील 1721 पैकी 1588 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती देण्यात आली. अनुदानित - 95, सरकारी - 09 आणि बिगर अनुदानित - 07 अशा एकूण 111 उच्च माध्यमिक विद्यालयांमधील हे विद्यार्थी होते. त्यासाठी एकूण 20 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

27 एप्रिल रोजी पुरवणी परीक्षा

दरम्यान, ‘सुधारणेची गरज’ या श्रेणीत ठेवण्यात आलेल्या किंवा कोणत्याही कारणामुळे परीक्षेस बसण्यास असमर्थ ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 27 एप्रिल रोजी मंडळाकडून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याशिवाय एक किंवा अधिक विषयांमध्ये स्वत:चे गुण सुधारावयाचे आहेत असे विद्यार्थीही ही पुरवणी परीक्षा देऊ शकतील, असे कळविण्यात आले आहे.

कॉपीसाठी चक्क चॅट जीपीटीचा वापर : दोन विद्यार्थ्यांना दिला भोपळा

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून मोबाईल, वैज्ञानिक गणकयंत्र, डिजिटल घड्याळे यासारखी उपकरणे केंद्रात नेली जाणार नाहीत याची कसून तपासणी आणि सर्वतोपरी खात्री करण्यात येत असली तरीही काही विद्यार्थी नाना क्लुप्त्या लढवून आणि परीक्षकांचे डोळे चुकवून मोबाईल वगैरे नेण्याचे धाडस करतात. मात्र कधीकधी धाडस असे काही अंगलट येते की अशा पकडलेल्या विद्यार्थ्यांना थेट भोपळा देण्यात येतो. त्याशिवाय नंतर खात्यांतर्गत चौकशीचा ससेमिरा मागे लागतो तो वेगळाच असतो. यंदाही अशाच दोघा ‘अती धाडसी’ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. मोबाईलवर प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे घेऊन चॅट जीपीटीच्या माध्यमातून त्यांची  उत्तरे शोधण्याचे प्रयत्न करत असताना परीक्षकांनी त्यांना रंगेहात पकडले होते. त्या दोघांनाही संबंधित विषयात शून्य गुण देण्यात आले आहेत, असे शेट्यो यांनी सांगितले.

भविष्यात परीक्षा केंद्रांवर जॅमर

दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविणे हा उपाय ठरू शकत नाही का? असा सवाल केला असता, आम्ही एकूण 20 केंद्रांवर परीक्षा घेत असतो. त्याशिवाय जॅमर बसविण्यासाठी मोबाईल कंपनीसह अन्य विविध यंत्रणांकडून मंजुरी घ्याव्या लागतात. तसेच एखाद्या परीक्षा केंद्राच्या आसपास लोकवस्ती असेल तर त्या लोकांनाही जॅमरचा त्रास होत असतो. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता प्रत्येक ठिकाणी जॅमर बसविणे तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्याही शक्य होत नाही. असे असले तरी, भविष्यात त्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असे शेट्यो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.