बारावी परीक्षेचा निकाल उद्या
मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांची घोषणा
पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा उच्चांक रचला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 12 वीच्या परीक्षा झाल्या आणि आता अवघ्या 26 दिवसांमध्ये निकालही जाहीर करण्याचे ठरविले आहे. दि. 1 मार्च रोजी परीक्षा संपल्या व 27 मार्च रोजी निकाल जाहीर केले जातील, अशी घोषणा मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी केली आहे. उद्या दि. 27 रोजी सायंकाळी 5 वा. 12 वीचे निकाल जाहीर केले जातील. गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 फेब्रुवारी 2025 पासून 12 वीच्या परीक्षा सुरू केल्या आणि त्या 1 मार्च 2025 रोजी संपुष्टात आल्या. यंदा 17686 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 9224 विद्यार्थिनी तर 8462 विद्यार्थी आहेत.
कला शाखेत 1241 मुले व 2827 मुली मिळून एकूण 4068, तर वाणिज्य शाखेत 2814 विद्यार्थी व 2271 विद्यार्थिनी म्हणजेच एकूण 5085 मुलांचा समावेश आहे. विज्ञान शाखेसाठी 2660 विद्यार्थी व 3426 विद्यार्थिनीं मिळून 6068 मुलांचा समावेश आहे. व्यावसायिक शाखेसाठी 1747 मुले व 700 विद्यार्थिनी मिळून 2447 जणांचा सामवेश आहे. खाजगी क्षेत्रातून 811 विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले हेते. गेल्यावर्षी 17511 जण परीक्षेला बसले होते 14884 जण उत्तीर्ण झाले व निकाल 85 टक्के लागला होता. गोव्यातील 20 परीक्षा केंद्रांतून यंदा या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. दरवर्षी एप्रिल किंवा मे मध्ये परीक्षेचे निकाल लागत होते. यंदा रेकॉर्ड ब्रेक करत मार्चच्या 27 तारखेलाच परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहेत. एवढ्या जलदगतीने निकाल लावणारी गोवा शालांत मंडळ ही देशातील पहिली संस्था ठरणार आहे.