१२ वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर विषयच बदलून आले
विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ
कोल्हापूर
बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर विषयच बदलून आल्याने विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडाला आहे. कोल्हापुरातील विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये हॉल तिकीटाचा घोळ झाला असल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी विद्यार्थी आणि पालक शाळेत एकवटले. अनेक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीट वर वेगळेच विषय तर काहींचे परीक्षा फॉर्म भरले नसल्याने गोंधळ उडाला आहे. ११ फेब्रुवारीपासून १२ वी ची परीक्षा सुरू होणार मात्र दोन दिवस आधी हॉलतिकीट मध्ये घोळ झाल्याने सगळीकडे गोंधळ उडाला आहे.
याप्रकरणी बारावीच्या अडीचशे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला होता, ज्या विषयाची निवड केली होती, त्याऐवजी महाविद्यालयाने परीक्षा फॉर्मवर परस्पर खाडाखोड करून विषय बदलले आहेत, असा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. ज्यांचा कॉम्प्यूटर सायन्स विषय आहे त्या जागी मराठी आणि भूगोल हे विषय आले आहेत असा गोंधळ अनेक विषयाबाबत झाला आहे. तसेच हॉल तिकीटवरील क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याने हॉल तिकीटच नकली असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.