यमकनमर्डीत 128 तोळे सोन्यावर डल्ला
घराचा कुलूप तोडून दागिने, रोकडसह 97 लाखांचा ऐवज लंपास
वार्ताहर/यमकनमर्डी
यमकनमर्डी (ता. हुक्केरी) येथील बाजारपेठेतील अजित दुगाणी यांच्या घरातील सुमारे 97 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील 128 तोळे सोने (89.60 लाख रु.), चांदी 8.50 किलो (5.95 लाख रुपये), रोख रक्कम 1.25 लाख रुपये असा सुमारे 96.80 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ऐन दिवाळी सणात झालेल्या या चोरीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, यमकनमर्डी येथील मुख्य बाजारपेठेत श्रीमंत असणाऱ्या विश्वनाथ मल्लाप्पा दुगाणी यांचे घर आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लॉकर व तिजोरीत असणाऱ्या साहित्यातून सोने, चांदी व रोकड हाती लागताच त्यांनी ते घेऊन पोबारा केला. सदर घटना बुधवारी सकाळी उजेडात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस विभाग, श्वान पथक आणि ठसे तज्ञ, एसओपीओ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानुसार तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. घटनास्थळी बेळगावचे एसपी भीमाशंकर गुळेद आणि गोकाकचे डीएसपी रवी नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसांत झाली आहे.