हवाई दलाचे 1264 अग्निवीर देशसेवेसाठी रुजू
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथील हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीरांच्या सहाव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शनिवारी शानदारपणे पार पडला. यावेळी 1264 महिला व पुरुष अग्निवीरांना देशसेवेसाठी शपथ देण्यात आली. 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सिद्ध झालेल्या या अग्निवीरांना हवाई दलाचे साहाय्यक प्रमुख व आरओ वेंकट मारे यांनी देशसेवेची शपथ दिली.
आरओ व्यंकट म्हणाले, अग्निविरांनी देशसेवा बजावताना जागरुक राहून परिस्थितीला जूळवून घेऊन कर्तव्यासाठी नेहमी वचनबद्ध रहावे. सतत बदलणारे जागतिक सुरक्षा आव्हानांचे स्वरुप ओळखून देशासाठी कार्यरत रहावे. अग्निविरांनी समर्पण, भक्ती आणि सोपविलेली सर्व कामे करण्यास सदैव तत्पर रहावे. नवीन व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी मन मोकळे ठेवावे. अग्निविरांनी सदैव शिकण्यास, नवीन आव्हाने स्वीकारण्यास व सतत विकसित होत असलेल्या जागतिक सुरक्षा वातावरणात प्रत्येक मिशनसाठी तत्पर रहावे. हवाई दलाच्या पुढच्या पिढीला घडविण्यात अग्निविरांची भूमिका मोलाची आहे. अग्निविरांना प्रशिक्षण देणाऱ्या एअर ऑफिसर कमांडिंग व एटीएसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांना प्रोत्साहन दिले.
विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निविरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एजीव्हीटी आशिष गुर्जर व एजीव्हीटी नीरज यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट, एजीव्हीटी रिहांशू नाथवट सामान्य सेवा प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्ट, एजीव्हीटी कुमावत गोवर्धन सर्वोत्तम निशाणेबाज, एजीव्हीटी प्रियांशू सिंग यांना सर्वोत्तम अष्टपैलू पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम अग्निविरांच्या कुटुंबीयांसाठीही एक महत्त्वपूर्ण होता. ते प्रभावी पासिंग आऊट परेड सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. यावेळी अग्निविरांनी विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.