काकती, होनगा येथील नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 125 गट
कृषी खात्याचे तांत्रिक व्यवस्थापक राजशेखर भट्ट यांची माहिती : कमी खर्चाची पर्यावरणपूरक शेती
वार्ताहर/काकती
काकती, होनगा नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 125 शेतकऱ्यांचे गट तयार करून कमी खर्चाची पर्यावरणपूरक शेती करण्याचा प्रमुख उद्देश आहे, असे कृषी खात्याचे तांत्रिक व्यवस्थापक राजशेखर भट्ट यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. कृषी खाते व रयत कृषी केंद्राच्यावतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानची कार्यशाळा काकतीत गुरूवारी पार पडली. अध्यक्षस्थानी ग्रा. पं.अध्यक्षा वर्षा मुचंडीकर होत्या. सुरेश गवी यांनी स्वागत केले. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भट्ट पुढे म्हणाले, रासायनिक खते आणि किटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जमिनचा पोत सुधारणे, जैवविविधतेचे संरक्षण करून विषमुक्त आणि पौष्टिक अन्नधान्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आहे.
नैसर्गिक शेतीत जीवामृत, बिजोपचार आणि मल्चिंग म्हणजे आच्छादन हे एक तंत्रज्ञान महत्त्वाचे असून, जंगलात ज्याप्रमाणे झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडून नैसर्गिकरित्या जमिनीचे संरक्षण होते व वाफसा म्हणजे मातीच्या कणांच्या दरम्यान हवा आणि पाण्याची योग्य पातळी असणे, परिणामी मुळाची चांगली वाढ होऊन पिके चांगली पोसतात. अशा नैसर्गिक शेतीच्या प्रमुख बाबी सांगितल्या. सुभाष मुंगारी, बसवाणी निलजकर, शिवाजी धायगोंडे, लक्ष्मण पाटील, नारायण होळी, अशोक देसाई आदी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सुमंत पोटे सुळगा यांनी तणनाशक व किटकनाशकाची फवारणी करताना सुरक्षितता बाळगण्याची माहिती दिली. कृषी अधिकारी अरुण कापशी यांनी आभार मानले.