For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जिल्ह्यात 122 शेतकऱ्यांची आत्महत्या

06:01 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जिल्ह्यात 122 शेतकऱ्यांची आत्महत्या
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात दुष्काळ, पीकहानी, कर्जाचा डोंगर यासह अनेक कारणांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 1 एप्रिल 2023 ते 4 जुलै 2024 या कालावधीत एकूण 1,182 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 122 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मागील 15 महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची आकडेवारी महसूल खात्याने दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 8 जुलै रोजी झालेल्या जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओंच्या बैठकीत ही माहिती सादर करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात 122, हावेरीत 120, धारवाडमध्ये 101 शेतकऱ्यांनी आत्महत्येला कवटाळले आहे. बेंगळूर ग्रामीण, कोलार आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झालेली नाही. एकूण 1,003 आत्महत्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची कुटुंबे मदत मिळविण्यास पात्र आहेत, अशी नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

विविध कारणांमुळे 161 प्रकरणांमध्ये मदतनिधी मिळविण्यास अपात्र असल्याची नोंद करून अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आतापर्यंत 994 शेतकरी कुटुंबांना मदतनिधीचे वितरण करण्यात आले आहे. तर 9 आत्महत्या प्रकरणांमध्ये शेतकरी कुटुंबांना मदतनिधी वितरण प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रलंबित आहे. 18 प्रकरणांमध्ये मदतनिधी वितरणासंबंधीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया बाकी आहे, अशी माहिती महसूल खात्याने दिली आहे.

उत्तर कर्नाटकातील काही भागात अधिक संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पावसाची हुलकावणी, पीकहानी आणि बँकेतील कर्जाची परतफेड करण्यात अपयश झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील ठोस कारणांविषयी अध्ययन करणे आवश्यक असल्याचे मत कृषी खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जफेड शक्य न झाल्याने जीवन संपविले आहे. वैयक्तिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कृषी कर्जफेडीच्या बाबतीत संयम बाळगण्याचे आणि परिस्थितीला अनुसरून कर्जफेडीसाठी मुदत देण्याची सूचना वाणिज्य आणि सहकारी बँकांना देण्यात आली आहे. तरी सुद्धा काही बँकांच्या अधिकाऱ्यांनी कर्ज परतफेडीसाठी नोटीस बजावल्या आहेत. हे देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे एक कारण असल्याचे महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या?

बिदर 36, कलबुर्गी 69, विजापूर 67, बागलकोट 19, बेळगाव 122, यादगिरी 68, धारवाड 101, गदग 32, कोप्पळ 30, रायचूर 18, कारवार 6, हावेरी 120, बळ्ळारी 19, विजयनगर 37, शिमोगा 66, दावणगेरे 43, चित्रदुर्ग 36, चिक्कमंगळूर 39, मंगळूर 6, हासन 47, तुमकूर 22, चिक्कबळ्ळापूर 2, कोडगू 6, म्हैसूर 74, मंड्या 45, रामनगर 9, बेंगळूर 1, चामराजनगर 2

Advertisement
Tags :

.