12 कुस्तीपटूंचे क्रीडामंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाण
जागतिक स्पर्धेतून भारतीय संघ मागे घेतल्याने संताप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अल्बेनियाला विमानाने जाण्याच्या अवघ्या 48 तास आधी जागतिक स्पर्धेसाठी निवडलेल्या 12 कुस्तीपटूंवर क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या निवासस्थानाबाहेर बसून त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी करण्याचा प्रसंग आला आहे. सदर प्रतिष्ठित स्पर्धेतून भारतीय संघांनी माघार घेतल्याने ही समस्या उपस्थित झाली आहे.
साक्षी मलिकचा पती कुस्तीपटू सत्यव्रत काडियन याने 23 वर्षांखालील आणि वरिष्ठ जागतिक स्पर्धांसाठी चाचण्या घेण्याच्या फेडरेशनच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघाला गुऊवारी तिन्ही भारतीय संघांना स्पर्धेच्या बाहेर काढणे भाग पडले. न्यायालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अस्थायी मंडळाला पुन्हा दैनंदिन कामकाज हाताळण्यास सांगितलेले असताना सदर क्रीडासंस्था न्यायालयाचा अवमान करत असल्याचा दावा सत्यव्रत यांनी केला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाला मंत्रालयाने निलंबित केले आहे आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अस्थायी मंडळाला पुन्हा लागू करण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे खेळाच आणि कुस्तीपटूंचे भवितव्य संकटात सापडले आहे. महिलांच्या 65 किलो वजनी गटासाठी पात्र ठरलेल्या मनशा भानवालाने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी 10-12 वर्षे लागतात आणि आता ही संधी आमच्याकडून हिरावून घेतली जात आहे. आमचा काय दोष आहे, असा सवाल तिने केला.
मनशाच्या सोबत सहकारी महिला कुस्तीपटू मानसी अहलावत (59 किलो), कीर्ती (55 किलो) आणि बिपाशा (72 किलो) तसेच पुरुष गटातील फ्रीस्टाइल प्रकारातील कुस्तीपटू उदित (61 किलो), मनीष गोस्वामी (70 किलो), परविंदर सिंग (79 किलो), संदीप मान (92 किलो) आणि ग्रीको-रोमन प्रकारातील संजीव (55 किलो), चेतन (63 किलो), अंकित गुलिया (72 किलो), आणि रोहित दहिया (82 किलो) हे देखील हरयाणातून येऊन मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पदपथावर बसले आहेत.