कोल्हापुरातील 12 हजार कर्मचाऱ्यांचे आज टपाली मतदान
कोल्हापूर :
विधानसभेच्या निवडणूक ड्यूटीवर असणारे सुमारे 12 हजार शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी आज, शनिवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या कामकाजावेळी त्यांना मतदान करता येणार नसल्याने निवडणूक विभागाने त्यांचे टपाली मतदानाचे नियोजन केले आहे.
विधानसभा 2024-29 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल, माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. प्रचारासाठी 10 दिवस बाकी असल्याने उमेदवारांकडून प्रचारही जोमाने सुरू झाला आहे. कोपरा सभा, पदयात्रा, मिसळ पे चर्चा, मेळावे घेतले जात आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर मतदानासाठीची तयारी सुरू केली आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदाना दिवशी या कर्मचाऱ्यांना मतदान करता येत नाही. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाकडून या सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान अगोदरच घेतले जाणार आहे. शनिवारी मतदानादिवशी ड्यूटी असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, नोडल ऑफीसर यांचे दहा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाच्या कक्षेत प्रशिक्षण आहे. या ठिकाणी सुमारे१२ हजार कर्मचाऱ्यांचे मतदानाची सोय केली आहे. बॅलेट पेपर शिक्के मारून त्यांना मतदान करावे लागणार आहे. बंद पाकिटामध्ये बॅलेट पेपर ठेवले जाणार असून मतमोजणी दिवशी ते उघडले जाणार आहेत.
निवडणूक ड्यूटीवरील पोलिसांचेही अगोदरच मतदान
जिल्ह्यात मतदानादिवशी मतदान केंद्रामध्ये ज्या पोलिसांना बंदोबस्तासाठी नेमले आहे. अशा पोलीस प्रशासनातील अधिकारी, पोलिसांचे मतदानही अगोदरच केले जाणार आहे. मतदानादिवशी ड्यूटीवर असणाऱ्या 1889 पोलिसांची यादी सध्या जिल्हा निवडणूक विभागाकडे आली आहे. या सर्व पोलिसांचे 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान, मतदान होणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र केली जाणार आहेत. सुमारे 3 हजार पोलिसांचे टपाली मतदान होणार आहे.