झारखंडमध्ये 12 जण सापडले रेल्वेखाली
दोघांचा जागीच मृत्यू : चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
► वृत्तसंस्था/ जामतारा
झारखंडच्या जामतारा जिह्यात बुधवारी संध्याकाळी भरधाव रेल्वेच्या कवेत जवळपास 10 ते 12 लोक सापडल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. उर्वरित जखमींना उपचारासाठी नजिकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 140 किमी अंतरावर कलझारियाजवळ हा अपघात झाल्याचे जामतारा उपविभागीय पोलीस अधिकारी मुजीबुर रहमान यांनी सांगितले. या घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी संध्याकाळी 7 वाजता घडली. प्राथमिक वृत्तानुसार त्यात फक्त दोन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि, काही माध्यमांनी मृतांचा आकडा 10-12 असल्याचा दावा केला होता. विद्यासागर-कसितार दरम्यान जाणारी टेन क्र. 12254 (अंगा एक्स्प्रेस) आसनसोल विभागात सायंकाळी 7 वाजता ‘एसीपी’मुळे (अलार्म चेन पुलिंग) थांबली होती. त्याचवेळी सायंकाळी 7.07 वाजता ऊळावरून चालत असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेने ठोकरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी मदत व बचावकार्य सुरू केले आहे.