अमेरिकेहून आणखी 12 भारतीय दाखल
पनामामधून थेट नवी दिल्लीत विमानाचे लँडिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेने बेकायदेशीर इमिग्रेशन अंतर्गत पनामाला पाठवलेल्या 12 भारतीय नागरिकांची पहिली तुकडी 23 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीत पोहोचली. पनामामधून 12 बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन आलेले विमान रविवारी संध्याकाळी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या सर्वांची भारतीय सुरक्षा एजन्सी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी अमेरिकेने त्यांना विशेष विमानाने नाही तर सामान्य विमानाने पाठवले आहे. चौथ्या टप्प्यात पाठविण्यात आलेल्या या 12 स्थलांतरितांपैकी चार जण पंजाबचे आहेत. त्यापैकी एक बाटला, एक गुरुदासपूर, एक जालंधर आणि एक चंदीगडचा आहे.
अमेरिकेने यापूर्वी तीन लष्करी विमानांमधून 332 भारतीयांना भारतात पाठवले आहे. त्यानंतर रविवारी एका नागरी विमानातून 12 भारतीयांना पाठवले आहे. अशाप्रकारे त्यांची संख्या 344 झाली आहे. अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणारे पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी भारतातील अमृतसर येथे उतरले. त्यावेळी विमानात 104 लोक आले होते. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 116 आणि 16 फेब्रुवारी रोजी 112 भारतीयांना घेऊन भारतात विमाने पोहोचली होती.