डोळ्यात मिरचीपूड टाकून 12 लाख रुपये पळविले
बेळगाव : होलसेल किराणा माल पुरवून वसुलीसाठी आलेल्या दोघा जणांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याजवळील 12 लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. गुर्लापूर क्रॉसजवळ ही घटना घडली असून मुडलगी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. तेरदाळ येथील जाफर मुजावर यांच्या होलसेल किराणा दुकानात काम करणारे इर्शाद मुजावर व संजू कोहळ्ळी हे मुडलगी तालुक्यात वसुलीसाठी आले होते. वसुलीची रक्कम घेऊन मोटारसायकलवरून तेरदाळला परतताना मोटारसायकलवरून आलेल्या चौघा जणांनी या दोघा जणांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याजवळील 12 लाख रुपये पळविले आहेत. जाफर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुडलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. जिल्ह्यात दरोडे, वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हरगापूरजवळ 3 कोटी 10 लाख रुपये पळविल्याची घटना ताजी असतानाच डोळ्यात मिरचीपूड टाकून 12 लाख रुपये पळविण्यात आले आहेत.