अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये 12 ठार
दोन दिवसांनंतर अमेरिकेकडून आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला : जॉर्डन, बहरीनमधील अमेरिकन तळांवर इराणचा प्रतिहल्ला
वृत्तसंस्था/तेहरान
अमेरिकेने दोन दिवसांनंतर इराणवर आणखी एक हल्ला केला आहे. अमेरिकेच्या लष्कराने मंगळवारी रात्री सिरिक, खुझेस्तान, केशम बेट आणि बंदर अब्बासवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 12 जण ठार आणि 68 जण जखमी झाल्याचा दावा इराणने केला आहे. सिरिकमध्ये एका विवाह सोहळ्यावर क्षेपणास्त्र आदळल्याने चार वर्षांच्या मुलासह पाच जण ठार झाल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्यान, खुझेस्तान प्रांतातील हल्ल्यात सात जण ठार आणि आठ जण जखमी झाले. तथापि, अमेरिकेने आपण केवळ इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने जॉर्डन आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
यापूर्वी, 30 ऑगस्ट रोजी, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या लारक बेटावरील दोन इराणी रॉकेट लाँचरवर हवाई हल्ला केला होता. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडकले आहे. तीन दिवसांत दुसऱ्यांदा, अमेरिकेच्या लष्कराने इराणमधील अनेक आयआरजीसी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरादाखल, इराणनेही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे. इराणच्या लोरेस्तान प्रांतातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. इराणी माध्यमांनुसार, जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करणारा हा सर्वात मोठा हल्ला असला तरी जॉर्डनने तो रोखल्याचा दावा केला आहे.
विवाह सोहळ्यावरही हल्ला
अमेरिकेने इराणच्या लोरेस्तान आणि केरमानशाहमध्ये हल्ले केले आहेत. दक्षिण इराणमधील बंदर अब्बास, केशम बेट, जास्क आणि सिरिक येथे अनेक मोठे स्फोट ऐकू आले. याव्यतिरिक्त आग्नेय चाबहार आणि कोनारक भागात चार क्षेपणास्त्रs पडली. दक्षिण इराणमधील सिरिक येथील एका विवाहस्थळावरील हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले आणि डझनभर लोक जखमी झाले.