‘पीओके’तील संघर्षात 12 जणांचा मृत्यू
सरकारविरोधात निदर्शने : पाकिस्तानी सैन्यावर क्रूरतेचा भारताचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) गेल्या पाच दिवसांपासून मूलभूत गरजांसाठी अनुदान कमी केल्याच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. निदर्शक सरकारवर मूलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत आहेत. या निदर्शनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही पीओकेमधील हिंसक निदर्शनांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. स्थानिक काश्मिरी लोकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
पीओकेमध्ये निष्पाप लोकांवर हल्ला केल्याचा आरोप भारताने पाकिस्तानवर केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंबंधी भूमिका मांडली. पाकिस्तानी सैन्य निष्पाप लोकांवर क्रूरता करत आहे. आम्ही पाकव्याप्त जम्मू काश्मीरच्या अनेक भागात निदर्शने पाहिली आहेत. हे पाकिस्तानच्या दडपशाही वर्तनाचे आणि या भागातील संसाधनांच्या लूटमारीचे परिणाम आहे. हा पीओकेवर जबरदस्तीने आणि बेकायदेशीर कब्जा आहे. मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले पाहिजे, असे जयस्वाल म्हणाले.
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात 200 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्ष तीव्र झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. या हिंसक वातावरणात कर्तव्य बजावणारे पोलीसही बळी पडले आहेत. पीओकेच्या विविध भागात दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबार केला जात आहे. स्थानिक माध्यमांनुसार, मुझफ्फराबादसारख्या शहरांमध्ये परिस्थिती सर्वात जास्त बिकट झाली आहे. सरकारने कर्फ्यू लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त तरुणांनी तो झुगारून निदर्शने सुरूच ठेवली आहेत.