12 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकन नौदलाकडून अटक; जाफना द्वीपकल्पावर कारवाई
वृत्तसंस्था/ चेन्नई
श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. मासेमारी करण्यासाठी श्रीलंकन सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अटकेबरोबरच मच्छिमारांच्या बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या मच्छिमारांना शनिवारी उत्तरी जाफना द्वीपकल्पातील कराईनगर किनारपट्टीवर अटक करण्यात आली. त्यांच्या तीन बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना कनकेसंथुराई बंदरात नेण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात मच्छिमारांच्या मुद्द्यावरून बराच काळ वाद सुरू आहे. तामिळनाडूला श्रीलंकेपासून वेगळे करणारी पाल्क स्ट्रेट ही अऊंद पट्टी आहे. दोन्ही देशांतील मच्छिमारांसाठी हे समृद्ध मासेमारी क्षेत्र आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय मच्छिमारांना अटक केल्याच्या घटना वेळोवेळी घडत आहेत. गेल्यावषी 2023 मध्ये लंकन नौदलाने 240 भारतीय मच्छिमारांना बेकायदेशीरपणे श्रीलंकेच्या पाण्यात प्रवेश केल्याबद्दल अटक केली होती. या कालावधीत 35 बोटी जप्त करण्यात आल्या होत्या.