बिहारमध्ये 12 जिल्हे पुराच्या विळख्यात
कोसी नदीवरील बांधासह सहा बंधारे फुटले : एक लाख लोकांना फटका
वृत्तसंस्था/ पाटणा
नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहारमधील 12 जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरभंगा येथील कोसी नदीचा बांध सोमवारी रात्री उशिरा फुटला. त्यानंतर आणखी काही बंधारे फुटल्यामुळे एक लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. सीतामढी, शिवहार आणि बगाहा जिह्यात बागमती नदीवरील 6 बंधारे फुटले आहेत. पश्चिम चंपारण जिह्यातही पाऊस आणि पुरामुळे हाहाकार निर्माण झाला असून आठ विभागातील 58 शाळांना प्रशासनाने 2 ऑक्टोबरपर्यंत सुटी जाहीर केली आहे.
बिहारमधील सुपौल आणि पश्चिम चंपारण भागात पुराचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. अररियामध्येही पाऊस आणि पुरामुळे रेल्वे ऊळावर पाणी साचले होते. रुळावरील पाण्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासांत पुराची व्याप्ती वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. महापुरामुळे सुमारे 2 लाख लोकांना फटका बसला आहे. नेपाळमधून सोडलेले पाणी बिहारच्या मैदानी भागात पसरण्याची शक्मयता असल्याने येथील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
बिहारमध्ये पुरामुळे 50 हून अधिक रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. रविवारी रात्री दरभंगामधील किरतपूरजवळ कोसीच्या उपप्रवाहाने पश्चिमेकडील तटबंदी तोडली. त्यानंतर बगाहा येथे चंपारण बंधाराही तुटला. पुरामुळे रसियारी, किरतपूर, बगरस, दोहाथा, जमालपूर, घागऊवा, कुबोल, धागा, तरवारा, टेत्री, अमृतनगर, पाखरिया, सिरसिया, राही टोल खटवारा, वारदीपूर सिरनिया, लक्ष्मीपूर, भंडारिया, कडवारा, कटारिया, राम खेतरिया यासह अनेक गावे प्रामुख्याने बाधित झाली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी पूरमय भागावर नजर ठेवून आहेत. येत्या 24 तासात पुराची व्याप्ती वाढण्याची शक्मयता असल्यामुळे नवीन भागातही पाणी पसरणार आहे.
एनडीआरएफच्या 11 टीम मैदानात
बिहारमधील पूरस्थिती पाहता केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी रविवारी एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. एनडीआरएफच्या 11 टीम पूरग्रस्त भागात काम करत आहेत. तसेच 8 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पूरस्थिती गंभीर बनल्यास आणखी काही तुकड्या तैनात केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.