बँक सोने चोरी प्रकरणात ‘घबाड’ हाती
आणखी 12 जण गजाआड : 39 किलो सोन्यासह 1 कोटी 16 लाखांची रोकड जप्त
विजापूर : राज्यातील आजवरच्या सर्वात मोठ्या बँक चोरी प्रकरणात विजापूर पोलिसांनी आणखी बारा जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून 39 किलो सोने व सोने विक्रीतून आलेले 1 कोटी 16 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले बहुतेक जण हुबळी परिसरातील असून यामध्ये रेल्वे कर्मचारी व प्राध्यापकांचाही समावेश आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती सोने व रोख रक्कम स्वरुपात मोठे ‘घबाड’ सापडल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामनगौडा हट्टी आदी अधिकारी उपस्थित होते. या मोठ्या चोरी प्रकरणाचा अखेर छडा लावण्यात आला आहे.
सुरुवातीला विजयकुमार मोहनराव मिरियाल (वय 41) या पॅनरा बँकेच्या सिनियर मॅनेजरसह चंद्रशेखर कोटीलिंगम नेरेल्ला (वय 38) रा. गदग रोड, हुबळी, सुनील नरसिंहलू मोका (वय 40) रा. गदग रोड, हुबळी या तिघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 10 कोटी 75 लाख रुपये किमतीचे साडेदहा किलो सोन्याचे दागिने व लगडी जप्त करण्यात आल्या होत्या.या त्रिकुटाच्या चौकशीतून उपलब्ध झालेल्या माहितीवरून बालराज मणिकम (वय 40), गुंडू जोसेफ (वय 28), चंदनराज वरदराज पिल्ले (वय 29), इजाज मकबूल अहमद धारवाड (वय 34), पीटर ऊर्फ विनोदचंद (वय 40), सुसईराज फ्रान्सिस डॅनियल (वय 44), बाबुराव धनम मिरियाल (वय 40), महम्मदआसिफ महम्मदयुसुफ कल्लूर (वय 31), अनिल मोहनराव मिरियाल (वय 40), अबू ऊर्फ मोहनकुमार गुंडय्या यशमाला (वय 42), सोलोमन वेस्ली पलकुरी (वय 40), मर्यादास जोबू ऊर्फ योबू गोना (वय 40) या बारा जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले सर्वजण जनता कॉलनी, केशवापूर, हुबळी परिसरातील आहेत. यामध्ये रेल्वेत काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मनगुळी येथील कॅनरा बँकेचे लॉकर फोडण्यासाठी बनावट चाव्या तयार करून देणाऱ्या मधुरा कॉलनी, हुबळी येथील युवकाचाही समावेश आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या पंधरावर पोहोचली आहे. 23 मे 2025 च्या सायंकाळी 6 ते 25 मेच्या सकाळी 11.30 या वेळेत मनगुळी, जि. विजापूर येथील कॅनरा बँकेच्या खिडकीचे गज कापून लॉकरमधील 53 कोटी 26 लाख रुपये किमतीचे 58 किलो 97 ग्रॅम सोन्याचे दागिने व 5 लाख 20 हजार 450 रुपये रोख रक्कम असा एकूण 53 कोटी 31 लाख 20 हजार 450 रुपये किमतीचा ऐवज चोरण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एनव्हीआरही पळविण्यात आले होते. 26 मे रोजी मनगुळी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल केला होता.
तपासासाठी आठ विशेष पथकांची केली होती स्थापना
चोरीच्या तपासासाठी शंभर पोलिसांचा समावेश असलेल्या आठ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक टी. एस. सुलफी, सुनील कांबळे, बल्लाप्पा नंदगावी, पोलीस निरीक्षक रमेश आवजी, गुरुशांत दाशाळ, अशोक चव्हाण, उपनिरीक्षक श्रीकांत कांबळे, अशोक नायक, देवराज उळ्ळागड्डी, बसवराज तिप्परेड्डी, राकेश बगली, सोमेश गेज्जी, विनोद दोडमनी, विनोद पुजारी, शिवानंद पाटील, यतीश के., नागरत्ना उप्पलदिन्नी आदी अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता. राज्यातील आजवरच्या सर्वात मोठ्या बँक चोरीचा छडा लावणाऱ्या विजापूर पोलिसांचे उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांनी कौतुक केले आहे.
पाच कारसह तीन सिलिंडर जप्त
अटक करण्यात आलेल्या पंधरा जणांकडून 39 किलो सोने व 1 कोटी 16 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 39 कोटी 26 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दोन इनोव्हा, एक रेनॉल्ट, एक किया व एक स्विफ्ट अशा पाच कार, रेल्वे खात्याची एक ट्रक, बनावट चाव्या, बनावट चाव्या तयार करण्यासाठी वापरलेली अवजारे, हेक्सा ब्लेड, सोने वितळवण्यासाठी वापरलेले दोन गॅस सिलिंडर, एक ऑक्सिजन सिलिंडर, बर्निंग गन, स्पॅनर, चार वॉकीटॉकी, पिस्तूलसारखे दिसणारे लायटर जप्त केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सोने विक्रीतून आलेली रक्कम गोव्यातील मॅजेस्टिक प्राईड कॅसिनोमध्ये 1 कोटी 16 लाख रुपये डिपॉझिट ठेवण्यात आले होते. पोलिसांनी ते जप्त केले आहेत.