बारा एकर हापूस आंबा बाग जळून भस्मसात
शिराळा :
इंग्रूळ (ता. शिराळा) येथील वाघधरा भागात अज्ञातांनी लावलेल्या आगीत बारा एकरातील हापूस आंबा बाग जळून भस्मसात झाली. ५०० आंबा झाडे जळाली. तसेच ठिबक सिंचन यंत्रणा ही जळाली. सदर आग ही अज्ञातांनी लावल्याची चर्चा घटनास्थळी सुरू आहे. आग वेळीच आटोक्यात आल्याने २००० आंब्याची झाडे वाचली.
या आगीत किमान दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक माहिती अशी, इंगूळ येथील वाघघरा भागात सुनंदा इंगवले आणि शितल इंगवले यांची २५ एकरात आंबा बाग आहे. सोमवारी (दि. ७) दुपारी एक नंतर आंबा बागेतून आगीचे लोट येत असल्याचे जवळच्या रानात असणाऱ्या शेतमजुरांच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी येथील व्यवस्थापक दिपक नांगरे-पाटील यांना फोनवरून याची माहिती दिली. यावेळी दिपक हे घटनास्थळी तातडीने आले. त्यानंतर उत्तम पाटील, साहिल पाटील, संग्राम यादव, संकेत पोखलेकर, माधुरी पोखलेकर यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या क्षेत्रातील ठिबक सिंचन यंत्रणा जळून भस्मसात झाली आहे. आग आटोक्यात आली नसती तर २५ एकर आंबा क्षेत्र जळून भस्मसात झाले असते. शिवाय ही जवळच असणाऱ्या कार्वे, शेखरवाडी या गावांपर्यंत पोचून तिथले डोंगरही जळून भस्मसात झाले असते. शासकीय पंचनामा बुधवारी ९ रोजी होणार आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी. जगन्नाथ खोत यांनी घटनास्थळी भेट दिली.