परिवहन कर्मचाऱ्यांना 12.50 टक्के वेतनवाढ
31 मार्च 2025 पासून लागू होईल याप्रमाणे अंमलबजावणी
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या पवित्र्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 12.50 टक्के वेतनवाढ देण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. ही वेतनवाढ 31 मार्च 2025 पासून लागू होईल, याप्रमाणे जारी केली जाईल. 1 जुलै 2026 च्या वेतनात जमा केली जाणार आहे.
राज्य परिवहन कर्मचारी संघटनांनी 25 टक्के वेतनवाढ देण्याची मागणी केली होती. वेतनवाढीसह इतर मागण्यांची पूर्तता न झालयास संपावर जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), बेंगळूर महानगर परिवहन मंडळ (बीएमटीसी), वायव्य रस्ते परिवहन निगम (एनडब्ल्यूकेआरटीसी) आणि कल्याण कर्नाटक रस्ते परिवहन निगम (केकेआरटीसी)च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनात 12.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वेतनवाढीबाबत परिवहन कर्मचारी संघटनेने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
वेतनवाढीमुळे चारीही परिवहन संस्थांना दरमहा 72.80 कोटी रुपये तर वार्षिक 873.64 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. राज्यातील सर्व परिवहन निगममधील एकूण 1 लाख 5 हजार कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या जुन्या वेतनातील थकबाकीचा पहिला हप्ता देखील मंजूर केला आहे. सरकारने यापूर्वी चारीही परिवहन संस्थांच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2021 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या एकूण 26 महिन्यांची थकबाकी देण्यास मंजुरी दिली होती. एकूण थकबाकीच्या रकमेपैकी 1,271.92 कोटी रुपयांपैकी 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता संबंधित परिवहन निगमना देण्याबाबतचा आदेश सरकारने जारी केला आहे.