वारीसाठी ११८ विशेष गाड्या;सुरक्षा यंत्रणा २४ तास अलर्ट
सोलापूर :
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले असून, त्यांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. यंदा रविवारी (दि. ६ जुलै) आषाढी एकादशी असून, भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत ११८ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत.
पंढरपूर रेल्वे स्थानकावर २४ तास सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून स्टेशन परिसरावर सतत लक्ष ठेवले जात आहे. प्लॅटफॉर्म, तिकीट घरं, प्रतीक्षालये, प्रवेशद्वार यासह संपूर्ण परिसरात ५० पेक्षा अधिक कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात आहे.
- रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून
सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ५० तिकीट तपासनीस (टीसी), १५० आरपीएफ व लोहमार्ग पोलीस, तांत्रिक कर्मचारी पंढरपूरात कार्यरत आहेत. पुणे विभागातून अतिरिक्त १६ टीसी आणि भुसावळ येथून अतिरिक्त आरपीएफ फोर्स मागवण्यात आले आहेत.
रेल्वे स्टेशन परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व पातळीवर दक्षता घेण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण, गाड्यांचे आगमन-प्रस्थान, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे या सर्व गोष्टींसाठी यंत्रणा सज्ज आहे.
- भाविकांसाठी सुविधा केंद्रे आणि वैद्यकीय पथके
तात्पुरती माहिती केंद्रे व हेल्प डेस्क
पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल टॉयलेट्स व स्नानगृहे
वेटिंग रूममध्ये खास व्यवस्था
प्रत्येक गाडीत वैद्यकीय किट व डॉक्टरांचे पथक
वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या छावण्या व निवासगृहे
- रेल्वे प्रशासनाचा भाविकांना संदेश
रेल्वे प्रशासनाने भाविकांना शिस्तीने आणि सहकार्याने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अडचणीसाठी जवळच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधावा, तिकीट न काढता प्रवास टाळावा व स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
"आषाढी एकादशीनिमित्त रेल्वे प्रशासनाकडून भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ११८ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पंढरपूर स्थानकावर सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष कार्यरत आहे आणि आरपीएफ, टीसी, लोहमार्ग पोलीस तसेच वरिष्ठ अधिकारी २४ तास कार्यरत आहेत."
– योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर