औषध क्षेत्रातील कंपनी सिप्लाला 1178 कोटी रुपयांचा नफा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतातील औषध क्षेत्रातील तिसऱ्या नंबरची सर्वात मोठी कंपनी सिप्ला यांनी जून तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 17 टक्के इतकी वार्षिक स्तरावर वाढ नोंदवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये कंपनीचे समभाग सहा टक्के इतके वाढलेले दिसून आले. याचसोबत सिप्लाचे समभाग शेअर बाजारामध्ये इंट्राडे दरम्यान 1599 रुपये या सर्वोच्च स्तरावर पोहोचलेले होते.
महसुलही दमदार वाढला
आर्थिक वर्ष 2025 मधील पहिल्या तिमाहीचा निकाल कंपनीने जाहीर केला असून 1178 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधी याच अवधीमध्ये कंपनीने 1003 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता. याच दरम्यान कंपनीच्या महसुलात सात टक्के वाढ झाली असून 6694 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने तिमाहित मिळवला आहे. यापूर्वी अनेक तज्ञांनी जो अंदाज वर्तवला होता त्यापेक्षा अधिक नफा कंपनीने मिळवल्याचे सांगितले जात आहे.
औषध विक्रीही वाढली
क्काही उत्पादनांना उत्तर अमेरिकेमध्ये चांगली मागणी दिसून आली आहे. श्वसनाच्या संदर्भातील अल्बुटोराल व कॅन्सर उपचारासाठी वापरण्यात येणारे ब्रिस्टल मीयर्स स्क्वीब या औषधांची विक्री वाढली आहे. औषध विक्रीत 13 टक्के इतकी वाढ दिसली आहे.