वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत 117 कोटींचा भ्रष्टाचार
विधानपरिषद सदस्य एन. रविकुमार यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत 117 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषद सदस्य एन. रविकुमार यांनी केली आहे. मल्लेश्वर येथील भाजप प्रदेश कार्यालय जगन्नाथ भवन येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा स्वतंत्र तपास संस्थेमार्फत करावी. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांचा राजीनामा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत आम्ही येत्या 24 तारखेला लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहोत. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून माननीय राज्यपालांनाही निवेदन दिले जाईल. वैद्यकीय शिक्षण खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. हावेरी, गुलबर्गा, कोप्पळ, यादगिरी, बेंगळूर, म्हैसूर आदींसह राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 114 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर उपकरणे खरेदी करण्यात आली असून त्यासाठी 176.70 कोटी ऊपये खर्च करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
कंपनीचे नाव बदलून निविदा मागविण्यात आली असून कोट्यावधी ऊपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या घोटाळ्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री, वैद्यकीय शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी यात सहभागी असल्याची माहिती आहे. सरकार 60 टक्के तर संबंधित संस्था 40 टक्के रक्कम अंतर्गत संसाधनातून देत असल्याचेही रविकुमार यांनी स्पष्ट केले.