‘स्वाभिमानी’च्या लढ्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी 117.16 कोटी रुपये
जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांना दोन महिन्यात द्यावे लागणार पैसे: गत हंगामात चौदा कारखान्यांनी दिली तीन हजाराहून कमी एफआरपी
कोल्हापूर/धीरज बरगे
गतहंगामातील ऊसाला दूसरा हप्ता मिळण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारलेल्या लढ्याला यश मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी 117.16 कोटी रुपये पडणार आहेत. ऊस दराबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार जिल्ह्यातील सहकारी व खाजगी अशा 22 साखर कारखान्यांना पुढील दोन महिन्यात हे पैसे द्यावे लागणार आहेत. कारखान्यांची गतहंगामातील गाळपाची आकडेवारी पाहता शंभर रुपये द्यावे लागणाऱ्या कारखान्यांकडून 86.16 लाख मे.टन तर पन्नास रुपये द्यावे लागणाऱ्या साखर कारखान्यांकडून 61.98 लाख मे.टन ऊस गाळप करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी गतहंगामात तुटलेल्या ऊसाला दूसरा हप्ता चारशे रुपये आणि यंदाच्या हंगामात पहिली उचल 3500 रुपये मिळण्याची मागणी केली. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला. संघटनांची हि मागणी साखर कारखानदारांनी अमान्य केल्याने ऊस दराचा तिढा पडला. संघटनांनी दूसरा हप्ता मिळाल्याशिवाय कारखाने सुरु होवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
त्यानुसार गाळप हंगाम सुरु होवून 23 दिवस उलटले तरी जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटली नाहीत. संघटनांच्या मागणीबाबत तोडगा काढण्यासाठी एकूण चार बैठका झाल्या. मात्र चारही बैठका निष्फळ ठरल्या. तोडगा निघत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी गुरुवारी पुणे-बेंगलोर माहामार्गावर पुलाची शिरोली येथे चक्काजाम आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. तब्बल नऊ तास शेतकरी महामार्गावर ठाण मांडून होते. अखेर सायंकाळी सात वाजता गतहंगामात तीन हजारहून अधिक एफआरपी दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन 50 रुपये आणि तीन हजारहून कमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन 100 रुपये देण्याबाबत शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यामध्ये एकमत झाले. या तोडग्यानुसार आता कारखानदारांना गतहंगामातील दूसऱ्या हप्त्यापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 117.16 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
14 कारखान्यांना द्यावो लागणार 100 रुपये
जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांनी तीन हजार आणि त्याहून कमी एफआरपी मागील हंगामात दिली आहे. या कारखान्यांना शेतकऱ्यांना दूसरा हप्ता 100 रुपये द्यावा लागणार आहे. कारखान्यांनी एकूण 86 लाख 16 हजार 748 मे.टन इतका ऊस गाळप केला आहे. त्यानुसार त्यांना 86 कोटी 16 लाख 74 हजार 800 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत.
आठ कारखान्यांना द्यावे लागणार 50 रुपये
जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी तीन हजारहून अधिक एफआरपी गतहंगामात दिली आहे. त्यांना दूसरा हप्ता 50 रुपये द्यावा लागणार आहे. या कारखान्यांनी एकूण 61 लाख 98 हजार 543 मे.टन ऊस गाळप केला आहे. त्यानुसार या आठ कारखान्यांना 30 कोटी 99 लाख 27 हजार 150 रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळाले
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतहंगामातील ऊसाला दूसरा हप्ता देण्याची मानसिकता कारखानदारांची नव्हती. दूसरा हप्त्यासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये सरकार, विरोधी पक्ष हे साखर कारखानदारांच्या पाठीशी राहिले. अशा या आव्हानात्मक परिस्थितीत शिवारातील कष्टकरी शेतकरी माझ्या पाठीशी राहिला. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच दूसऱ्या हप्त्यासाठी उभारलेला लढा यशस्वी झाला. गेली अडीच महिने सुरु असलेल्या या लढ्यामधून अखेर शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळाले याचा सर्वस्वी आनंद आहे.
- माजी खासदार राजू शेट्टी, संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना.