इराणहून 1,117 भारतीय मायदेशी
ऑपरेशन सिंधू : विमानातून उतरताच ‘वंदे मातरम्’चे नारे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान ‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत आतापर्यंत एकूण 1,117 भारतीय मायदेशी दाखल झाले आहेत. इराणहून दिल्लीला पोहोचलेल्या या प्रवाशांनी विमानतळावर ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी काही जण भावूकही झाले. भारतात दाखल होताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काहींनी जमिनीवर डोके टेकवत भारतमातेला प्रणाम केला. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
मशहद येथून शनिवारी रात्री 11:30 वाजता आणखी एक विमान 290 नागरिकांसह नवी दिल्लीला पोहोचले. त्यापूर्वी 310 नागरिकांचा एक गट सायंकाळी 4.30 वाजता राजधानीत पोहोचला होता. 20 जून रोजी 407 भारतीय दोन तुकड्यांमध्ये परतले. यामध्ये दिल्ली, हरियाणा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील लोकांचा समावेश होता. तर 19 जून रोजी 110 विद्यार्थी आर्मेनिया आणि दोहामार्गे भारतात पोहोचले होते.
इराणने हवाई क्षेत्र उघडल्याने दिलासा
इराणने हवाई क्षेत्रावरील निर्बंध हटवून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची परवानगी दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. भारतीयांच्या वापसीसाठी सर्व प्रवाशांना इराणची राजधानी तेहरान येथून मशहद येथे आणण्यात आले. त्यानंतर चार्टर विमानांद्वारे भारतात आणण्यात आले. ही उ•ाणे इराणी एअरलाइन महानने चालवली होती. ही व्यवस्था भारत सरकारने ऑपरेशन सिंधू अंतर्गत केली होती. आवश्यकता भासल्यास येत्या काळात आणखी विमाने चालवता येतील, असे इराणी दूतावासातील मिशनचे उपप्रमुख मोहम्मद जवाद हुसैनी यांनी सांगितले.