11000 वर्षे जुनी रहस्यमय मूर्ती
मूर्तीवर लिहिला आहे अनोखा संदेश
लाकडांचे अस्तित्व फार तर काही शतकांपर्यंत राहते. परंतु लाकडाने तयार केलेली कलाकृती हजारो वर्षांपर्यंत सुरक्षित राहण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. परंतु 11,000 वर्षांपेक्षाही जुनी लाकडाने निर्मित अदभूत मूर्ती आजही सुस्थितीत आहे.
लाकडाची ही रहस्यमय मूर्ती जवळपास 125 वर्षांपूर्वी म्हणजेच 1890 मध्ये सायबेरियन पीट बोगच्या शिगीर भागात मिळाली होती. या भागात सोन्याचे उत्खनन करणाऱ्या कामगारांना जमिनीत सुमारे 13.5 फूट खोलवर ही मूर्ती सापडली होती. मूर्तीची उंची सुमारे 17.5 फूट असली तरीही तुटल्याने ती 9 फुटांच्या आसपास राहिली आहे.
प्रारंभिक तपासणीत या मूर्तीला
9,500 वर्षांपूर्वीचे ठरविण्यात आले होते, परंतु वैज्ञानिकांच्या एका टीमकडून काही वर्षांपूर्वी रेडिओकार्बन डेटिंगनंतर ही मूर्ती 11,000 वर्षांपेक्षाही जुनी घोषित करण्यात आली. मूर्ती निर्माण करण्याची कलाही काही वेगळी आहे. जुन्या लार्च वृक्षाला कापून आणि कोरून तयार केलेल्या या नक्षीदार मूर्तीच्या चेहऱ्यात डोळे, नाक आणि तोंड आहे, परंतु मानेखालील शरीर अत्यंत सपाट आणि आयताकृती आहे.
यात मुख्य चेहऱ्याच्या अतिरिक्त आणखी अनेक चेहरे आहेत. वेगवेगळ्या कोनांमधून पाहिल्यास याचे 7 चेहरे स्पष्ट दिसतात, त्यातील एक चेहरा आश्चर्यकारक स्वरुपात त्रिआयामी म्हणजेच थ्री-डायमेन्शनल आहे. जगातील सर्वात मोठ्या आश्चर्यांमध्ये एक या मूर्तीला सध्या रशियाच्या येसटेरिनबर्गच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी जगभरातील लोक गर्दी करत असतात. ही मूर्ती जगातील प्राचीन काष्ठ-रचना असून त्याचे वयोमान इजिप्तचे पिरॅमिड आणि इंग्लंडच्या स्टोनहेजपेक्षा दुपटीने अधिक आहे. शिगीर आयडल नावाने प्रसिद्ध प्रस्तर युगाच्या या मूर्तीच्या चहुबाजूला अज्ञात लिपित काही शब्द कोरण्यात आले असून काही आडव्या-तिरक्या किंवा वक्र ज्यामितिक रेषा काढण्यात आल्या आहेत. लिपी आणि संकेतांची आजवर उकल करता आलेली नाही.
या लिपीत मूर्तीच्या निर्मितीचे तंत्रज्ञान नोंद असल्याचा अनुमान आहे. या भागात प्रवास करणाऱ्यांसाठी नकाशा आणि दिशानिर्देश, देवीदेवतांची स्तुती, प्रेतात्म्यांना आहुत करणे आणि पळवून लावण्याचे मंत्र असल्याचे किंवा जंगलाच्या एखाद्या क्षेत्रात प्रवेश न करण्याचा इशारा असल्याचा अनुमान आहे.
आम्ही आतापर्यंत एक आश्चर्यासोबत या मूर्तीचे अध्ययन केले आहे. ही विराट भावनात्मक बळ आणि मूल्यांने निर्मित एक अदभूत कलाकृती आहे. याला आणि याच्या संदेशाला समजून घेणे अत्यंत कठिण आहे, असे उद्गार रशियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड आर्कियोलॉजीचे प्रसिद्ध वैज्ञानिक मिखाइल ज्हिलिन यांनी काढले आहेत.