For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्खननात मिळाला 11 हजार वर्षे जुना खजिना

06:09 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्खननात मिळाला 11 हजार वर्षे जुना खजिना
Advertisement

तुर्कियेच्या एका पुरातत्व स्थळी उत्खननादरम्यान 11 हजार वर्षे जुना खजिना हाती लागला आहे. तसेच भीतीदायक गोष्टीही दिसून आल्या आहेत. या वस्तूंची तपासणी करण्यात आली असता झालेला खुलासा तज्ञांना थक्क करणारा होता. या खुलाशामुळे सध्याच्या युगात मानवी जीवनात महत्त्वाचा हिस्सा असलेल्या परंपरा हजारो वर्षांपूर्वीच विकसित झाल्या होत्या असे म्हणता येणार आहे. बोनकुक्लू तरला पुरातत्वस्थळी हे उत्खनन झाले आहे.

Advertisement

उत्खननात येथे मानवी अवशेषांसह धातूंचे दागिने सापडले आहेत. या सर्व सामग्रीचे कार्बन डेटिंग करण्यात आले असता हजारो वर्षांपासून चालत आलेली कान-नाकात छिद्र करवून घेण्याच्या परंपरेचे पुरावे मिळाले आहेत. अंकारा विद्यापीठाच्या पथकाने 100 हून अधिक दागिन्यांच्या तपासणीनंतर हा खुलासा केला आहे. आतापर्यत नाक-कानाला छिद्र पाडून घेण्याची परंपरा 200 वर्षे जुनी असल्याचे मानले जात होते.

हे सर्व दागिने थेट मानवी अवशेषांच्या कानांच्या नजीक आढळून आले आहेत. यामुळे कान आणि नाकात छिद्र पाडवून घेण्याची परंपरा 11 हजार वर्षांपूर्वीही प्रचलित होती असे स्पष्ट होते. शोधण्यात आलेल्या दागिन्यांपैकी 85 दागिने अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत. हे दागिने प्रामुख्याने चुनादगड, ओब्सीडियन किंवा नदीतील  दगडांद्वारे तयार करण्यात आले आहेत. या दागिन्यांचे वेगवेगळे आकार पाहता त्यांना कान किंवा खालील ओठात परिधान करण्यासाठी तयार करण्यात आले असावे असे पथकाने म्हटले आहे. तसेच हे पुरावे केवळ महिला नव्हे पुरुषही परिधान करत होते.

Advertisement

आजच्या काळात मुलांच्या नाक आणि कानातही छिद्र करून घेतले जाते. परंतु 11 हजार वर्षांपूर्वी असे केले जात नव्हते. केवळ प्रौढ लोकच हे करत होते. शिशूंना जेथे दफन करण्यात आले होते, तेथे कुठल्याही प्रकारचे दागिने आढळून आलेले नाहीत. नाक आणि कान आणि ओठांना छिद्र करवून घेण्याचे सामाजिक महत्त्व देखील होते. हा प्रकार एखाद्या व्यक्तीच्या परिपक्वतेचा संकेत देणारा होता.

Advertisement
Tags :

.