महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये 11 दहशतवाद्यांना कंठस्नान

06:49 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिरीबाम विभागात धडक कारवाई : सुरक्षा सैनिकांच्या तळावर गोळीबार केल्यानंतर चकमक

Advertisement

वृत्तसंस्था / इंफाळ

Advertisement

मणिपूर राज्याच्या जिरीबाम भागात सुरक्षा सैनिकांनी एका धडक कारवाईत किमान 11 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सोमवारी हा संघर्ष घडला. जिरीबाम भागातल्या जाकुराडोर कारोंग या वनक्षेत्रात सुरक्षा सैनिकांच्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक घडली. सैनिकांनीही या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक एक तास चालली होती.

या संघर्षात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन सैनिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार होत आहेत. दलाने या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार प्रथम नागरी वेषात आलेल्या आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी कारोंग येथील पोलीस चौकी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलीस चौकीवर प्रचंड गोळीबार केला. या पोलीस चौकीजवळच केंद्रीय राखीव पोलीस दलाचा तळ आहे. या तळावरही हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. यावेळी सैनिकांच्या एका तुकडीने दहशतवाद्यांवर प्रतिहल्ला करून त्यांच्यापैकी किमान 11 जणांना ठार केले. दहशतवाद्यांची संख्या किमान 20 असावी असे वृत्त आहे. अनेक दहशतवादी गंभीर जखमीही झाले आहेत.

घरे, दुकानांना लावल्या आगी

सैनिकांशी चकमक होत असताना दहशतवाद्यांच्या एका गटाने तेथून पळ काढला आणि या परिसरातील घरे आणि दुकानांवर हल्ला केला. त्यांनी अनेक घरे आणि दुकानांना आगी लावल्याचे वृत्त आहे. या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम आता सुरक्षा सैनिकांनी हाती घेतले आहे. या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून दहशतवाद्यांच्या लपण्याच्या स्थानांची झडती घेतली जात आहे.

मृतदेह पोलीस स्थानकात

चकमक थांबल्यानंतर दहशतवाद्यांचे अनेक मृतदेह जवळच्या बोरोकेक्रा पोलीस स्थानकात ओळख पटविण्यासाठी आणण्यात आले होते. या भागात आता संचारबंदी घोषित करण्यात आली असून सैनिकांच्या अनेक तुकड्या लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून जिरीबाम भागात दहशतवादी आणि फुटिरवाद्यांच्या देशविघातक कारवाया सुरु आहेत. या कारवायांमुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता यांना मोठा धोका निर्माण झाला असून त्यामुळे ही कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती, असे वक्तव्य नंतर सीआरपीएफकडून करण्यात आले.

हिंसाचाराच्या अनेक घटना

गेल्या जून महिन्यापासून या भागात दहशतवादी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा भाग राज्यातील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त भाग असून त्यामुळे येथे वाढीव सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झैरोन हिमार खेड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर सहा घरे जाळून भस्मसात करण्यात आली होती.

आतापर्यंत 200 हून अधिक ठार

मे 2023 पासून आतापर्यंत इंफाळचे खोरे आणि त्याच्या आसपासच्या डोंगराळ विभागातील लोकांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. हा संघर्ष खोऱ्यातील मैतेयी समाज आणि डोंगराळ भागातील कुकी समाज यांच्यात प्रामुख्याने होत आहे. हा संघर्ष अद्याप मिटलेला नसतानाच म्यानमार या शेजारी देशाचे पाठबळ मिळालेल्या अन्य काही दहशतवादी संघटनांनी या भागात हिंसाचार वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या संघर्षामुळे या भागातील शांतता धोक्यात आली असून केंद्र सरकारने या हिंसाचाराची गंभीर नोंद घेत सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article