विधान परिषदेवर 11 जण बिनविरोध
द्विवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे 7, भाजप 3 तर निजदच्या एका उमेदवाराची निवड
बेंगळूर : कर्नाटक विधानसभेवरून विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 11 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने 7, भाजपने तीन आणि निजदने एक उमेदवार दिला होता. हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा विधानसभेच्या सचिव तथा निवडणूक अधिकारी एम. के. विशालाक्षी यांनी केली आहे. काँग्रेसचे यतिंद्र सिद्धरामय्या, मंत्री बोसराजू, के. गोविंदराजू, वसंतकुमार, माजी विधानपरिषद सदस्य आयवान डिसोझा, शिमोग्याच्या बिल्किस बानो, जगदेव गुत्तेदार या सात जणांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपमधून माजी मंत्री सी. टी. रवी, एन. रविकुमार, मराठा समुदायाचे नेते एम. जी. मुळे तसेच निजदमधून जवरै गौडा यांचीही विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेवरून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 13 जून रोजी मतदान निश्चित झाले होते. 27 मे ते 3 जून या कालावधीत एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 4 मे रोजी अर्ज छाननीवेळी असिफ पाशा आर. एम. यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही स्वाक्षरी नसल्याने तो फेटाळला गेला होता. गुरुवार 6 जून रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. कोणीही माघार न घेतल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या 11 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
शिक्षक, पदवीधरमध्ये युतीच्या सरशीचे संकेत
विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारससंघांसाठी झालेल्या निवडणुकीपैकी दोन मतदारसंघांचा निकाल हाती आला आहे. दक्षिण शिक्षक मतदारसंघातून भाजप आणि नैर्त्रुत्य शिक्षक मतदारसंघातून निजदचा उमेदवार निवडून आला आहे. उर्वरित चार मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेस उमेदवार पिछाडीवर राहिले आहेत. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि निजदने युती केली होती. भाजपने पाच तर निजदने एक उमेदवार दिला होता. काँग्रेसने सहा उमेदवार उभे केले होते. दक्षिण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे के. व्ही. विवेकानंद यांनी विजयावर मोहोर उमटविली आहे. त्यांनी प्रथम प्राधान्याची मोठ्या प्रमाणावर मते काँग्रेसचे उमेदवार मरितिब्बगौडा यांना पराभूत केले. त्यामुळे मरितिब्बेगौडा यांची विधानपरिषदेवरील डबल हॅट्ट्रीक हुकली आहे. विवेकानंद यांना 10,823 तर मरितिब्बगौडा यांना 6,201 मते मिळाली. याच मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या वाटाळ नागराज यांना केवळ 84 मते पडली आहे. या मतदारसंघात तब्बल 1049 मते अवैध ठरली आहेत. दक्षिण शिक्षक मतदारसंघात म्हैसूर, हासन, मंड्या आणि चामराजनगर मतदारसंघांचा समावेश होतो.
नैर्त्रुत्य शिक्षक मतदारसंघातून निजदचे उमेदवार एस. एल. भोजेगौडा पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनी प्रथम प्राधान्याची अधिक मते मिळवत 5,267 मताधिक्याने प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार के. के. मंजुनाथ यांचा पराभव केला. मंजुनाथ यांना 4,562 तर भोजेगौडा यांना 9,829 मते मिळाली. 821 मते अवैध ठरली. विधानपरिषदेच्या नैर्त्रुत्य पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्या पेरीतील मतमोजणीत भाजप उमेदवार धनंजय सर्जी आघाडीवर असून काँग्रेसचे उमेदवार आयनूर मंजुनाथ पिछाडीवर आहेत. तर भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केलेले के. रघुपती भट तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे कल्याण कर्नाटक भागातील ईशान्य पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार अमरनाथ पाटील, आग्नेय शिक्षक मतदारसंघातील भाजपचे ए. नारायणस्वामी, बेंगळूर पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार ए. देवेगौडा पहिल्या फेरीतील मतमोजणीत आघाडीवर आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असल्याने शुक्रवारी स्पष्ट आकडेवारी उपलब्ध होईल.