For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी 11 फिरती वाहने

10:56 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशमूर्ती विसर्जनासाठी 11 फिरती वाहने
Advertisement

वाहनांतील कुंडांमध्ये मूर्ती विसर्जन करून प्रदूषण टाळण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : जल प्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी फिरते विसर्जन कुंड वाहनांतून विविध परिसरांमध्ये उपलब्ध करण्यात येतात. बुधवार दि. 11 रोजी पाचव्या दिवशी घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी एकूण 11 वाहने महानगरपालिकेने सज्ज केली आहेत. ती वाहने विविध भागात पाठविण्यात येणार आहेत. त्या वाहनांतील कुंडांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करून प्रदूषण टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे.

बुधवार दि. 11 रोजी दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत ही वाहने शहरामध्ये फिरविण्यात येणार आहेत. त्याठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन कराव्यात, असे कळविण्यात आले आहे. भाग्यनगर पाचवा क्रॉस, पहिले रेल्वेगेट, जुना पी. बी. रोड ते खासबाग येथील धाकोजी हॉस्पिटल, बसवेश्वर सर्कल खासबाग, सुभाष मार्केट हिंदवाडी, विश्वेश्वरय्यानगर येथील बसथांबा, रामलिंगखिंड गल्ली टिळक चौक, कणबर्गी देवस्थानकडे जाणारा रस्ता, देवराज अर्स कॉलनी येथील तलावाशेजारी, सह्याद्रीनगर येथील जलकुंभ, हिंडलगा येथे ही वाहने उभी करण्यात येणार आहेत.

Advertisement

मूर्ती विसर्जनासाठी मोबाईल-फिरत्या वाहनांचे दरवर्षीच नियोजन करण्यात येते. यावर्षीही पाचव्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने तयारी केली आहे. 11 वाहने विविध भागामध्ये फिरणार आहेत. त्याठिकाणी गणेशमूर्ती नेऊन विसर्जन करावे, असे कळविण्यात आले आहे.

मनपाकडून 20 क्रेन उपलब्ध

शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील गणेशोत्सव मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पाडली जाते. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिका दरवर्षीच तयारी करत असते. यावर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी 20 क्रेन तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली आहे.

कपिलेश्वर येथील जुन्या तलावाच्या ठिकाणी चार, नवीन तलावाशेजारी पाच, जक्कीनहोंडा येथे तीन, जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलाव येथे एक, कणबर्गी येथील तलावाजवळ दोन, किल्ला तलाव येथे दोन, अनगोळ येथील तलावाजवळ एक, मजगाव येथील कलमेश्वर तलावाजवळ एक, तसेच एक अतिरिक्त क्रेन उपलब्ध करण्यात आली आहे. या क्रेनच्या माध्यमातून गणेशमूर्ती अत्यंत शिस्तबद्धरित्या विसर्जन करण्यात येणार आहेत.

शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन केल्या जाणाऱ्या ठिकाणी क्रेन उभ्या केल्या जाणार आहेत. याचबरोबर त्याठिकाणी निर्माल्यकुंडदेखील बसविण्यात आले आहेत. निर्माल्य टाकताना प्रत्येकाने कुंडामध्येच टाकावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. क्रेनवर चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त चालक तैनात करण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये याची दक्षता घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.