फटाके कारखान्यातील स्फोटात 11 जण ठार
अन्य 20 जण होरपळले, तीन घरे जमीनदोस्त : प्रयागराज हवाई दल तळाजवळ दुर्घटना :
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज-कौशांबी सीमेवरील फटाक्यांच्या कारखान्यात सोमवारी मोठा स्फोट झाला. यात दोन मुलांसह 11 जण ठार झाले असून 20 जण होरपळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात संपूर्ण कारखाना जमीनदोस्त झाला. तसेच 100 मीटरच्या परिसरातील आठ घरांचे नुकसान झाले, त्यापैकी तीन घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.
फटाके कारखान्यात स्फोट होण्याची दुर्घटना कौशांबी जिह्यातील मोहम्मदपूर गावात दुपारी 12:30 वाजता घडली. हे गाव प्रयागराज सीमेवर आहे. येथून मनुरी येथील हवाई दल तळ 2 किमी अंतरावर आहे. या घटनेनंतर पोलीस, हवाई दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे 200 जवान बचावकार्यात गुंतले होते. तसेच 10 बुलडोझर ढिगारा हटवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा पोलिसांना संशय असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. अपघाताच्या वेळी कारखान्यात 20 हून अधिक कामगार काम करत होते. जवळच्या घरातील काही लोकही जखमी झाले. स्फोटाचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. थोड्याच वेळात धुराच्या लोटाने संपूर्ण परिसर व्यापला. स्फोटानंतर फटाक्यांमुळे सतत स्फोट होत होते. गावकरी होरपळलेल्या लोकांना खाटांवरून घेऊन जाताना दिसले. कारखान्यानजिकच्या एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर मोठे भगदाड पडले होते, यावरून स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. स्फोट झालेला एकमजली कारखाना 800 चौरस फूट जागेवर बांधण्यात आला होता.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. मृतांमध्ये प्रवीण (13) आणि प्रियांशी (5) या दोन मुलांचा समावेश होता. घटनेच्या वेळी कारखान्यात किमान 15 लोक काम करत होते. पोलिसांनी कामगारांसह जवळच्या सात रहिवाशांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी काही जण गंभीर जखमी आहेत.
स्फोटाचा आवाज 2 किलोमीटरपर्यंत
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज 2 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. तसेच स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. संपूर्ण फटाक्यांचा कारखाना जमीनदोस्त झाला आणि 50 ते 70 मीटरच्या परिघातील पाच ते सात जवळची घरेही उद्ध्वस्त झाली. स्फोटाचे कारण अज्ञात आहे, परंतु निष्काळजीपणा हे एक प्रमुख कारण असल्याचा संशय आहे.